भारतीय फुटबॉल महासंघाचे ज्योतिष कनेक्शन
भारतीय फुटबॉल महासंघाने म्हणजे एआयएफएफने टीमचे नशीब चमकावे आणि आशियाई कप मध्ये टीम ला जागा मिळावी म्हणून ज्योतिषाचा सल्ला घेतल्याचे आणि त्यासाठी या ज्योतिष संस्थेला १६ लाख रुपये मोजल्याचे वृत्त आहे. सुनील छेत्री कप्तान असलेली टीम त्यांच्या ग्रुप मध्ये टॉपवर असून मुख्य स्पर्धेसाठी क़्वालिफ़ाय झाली आहे. ज्योतिष सल्ल्याचा त्यात वाटा किती अशी चर्चा आता सुरु झाली आहे.
विविध खेळ खेळणारे खेळाडू अनेकदा वैयक्तिक पातळीवर ज्योतिष सल्ला घेतात हे नवीन नाही. खास लकी रंग, अंगठ्या, कपडे अनेक खेळाडू नेहमी वापरताना दिसतात तसेच अनेकांचा नंबर सुद्धा खास असतो. पण एखाद्या क्रीडा संघटनेने ज्योतिष सल्ला घेण्याचा आणि त्यासाठी पैसे मोजण्याचा हा प्रकार नवीन असून त्यामुळे त्यावर जोरदार प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार एएफसी आशियाई कप क्वालीफायर पूर्वी राष्ट्रीय टीम साठी एका संस्थेबरोबर करार केला गेला होता. या संस्थेचे काम खेळाडूना प्रेरणा देणे हे होते. नंतर मात्र ज्या कंपनी बरोबर हा करार झाला ती ज्योतिष क्षेत्रातील असल्याचे समोर आले तेव्हा त्यावर चर्चा सुरु झाली. आता टीम फायनल २४ संघात निवडली गेल्याने ज्योतिषाचा हा प्रभाव कि खेळाडूंचे कौशल्य यावर मते व्यक्त होत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार या कंपनीने टीम बरोबर तीन सेशन घेतली होती.
अर्थात फुटबॉल खेळाला काळी जादू नवी नाही. दिल्लीच्या एका क्लबने पूर्वी मेरठ येथील एका बाबाची मदत घेतली होती आणि टीम विजयी झाल्यावर त्याचे श्रेय या बाबांना दिले होते. दरम्यान फुटबॉल महासंघात सुरु असलेले काही आक्षेपार्ह प्रकार लक्षात घेऊन सुप्रीम कोर्टाने तीन सदस्यीय प्रशासकीय समिती नेमून त्यांच्या हाती सर्व व्यवहार दिले आहेत. दीर्घकाळ प्रफुल्ल पटेल यांचे या संघटनेवर वर्चस्व होते पण त्यांची अध्यक्षपदावरून हकालपट्टी केली गेली आहे असे समजते.