चीनी लोकांना भारतीयाकडून योगाचे धडे
उत्तर प्रदेशच्या बुंदेलखंड भागातील ललितपूर या अतिशय छोट्या गावातील सोहन सिंह गेली १८ वर्षे चीनी लोकांना भारतीय योगाचे धडे देत आहेत. २१ जून रोजी साजऱ्या झालेल्या आंतरराष्ट्रीय योग दिनी चीन मध्ये भारतीय योगाचा डंका पिटला गेला असून या दिवशी लाखो चीनी लोकानी एकाचवेळी योग केला असल्याचे समजते.
सोहन सिंग यांचे बालपण अतिशय गरिबीत गेले आहे. त्यांच्या आईने त्यांना योगाभ्यासाची आवड बालपणापासून लावली. बीएससी झाल्यावर त्यांनी संगणक विषयात शिक्षण घेतले आणि नशीब अजमावण्यासाठी थायलंडची वाट धरली. नंतर त्यांनी पोलंड आणि चीन मध्ये नोकरी केली आणि अखेरी चीन मध्ये योग प्रशिक्षण केंद्र स्थापन केले. आज चीनच्या विविध भागात त्यांची १० केंद्रे असून जगभरात टीमच्या मदतीने ते ३० योग केंद्रे संचालित करतात. आज चीन मधील अनेक सेलेब्रिटीचे गुरु म्हणून ते प्रसिद्ध आहेत. गेली १८ वर्षे ते चीन मध्ये योगप्रसाराचे काम करत आहेत.
ते म्हणतात, चीनी नागरिक आरोग्याबरोबर मनशांती साठी योग करण्यास प्राधान्य देत आहेतच पण भारतीय योगाभ्यासाने लाखो विदेशी जोडले गेले आहेत. चीनच्या फुजियान प्रांतातील जियामीन बेटावर सोहन यांचे मुख्यालय आहे. चीन मध्ये योगाला प्रतिष्ठा मिळवून देण्यात त्यांनी मोठे योगदान दिले आहे.