बेंगळुरू – भारताचा सीनियर ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनला कोरोनाची बाधा झाली आहे. यामुळे पाचव्या कसोटीसाठी तो आपल्या सहकाऱ्यांसोबत इंग्लंडला जाऊ शकला नाही. बीसीसीआयने माहिती दिली की अश्विन सध्या क्वारंटाईनमध्ये आहे आणि सर्व प्रोटोकॉल आवश्यकता पूर्ण केल्यानंतरच तो संघात सामील होईल.
India Tour of England : अश्विन कोरोनाच्या विळख्यात, टीमसोबत जाता आले नाही इंग्लंडला
बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितले की अश्विन संघासोबत यूकेला गेला नाही कारण रवाना होण्यापूर्वी त्याची कोविड-19 चाचणी झाली होती, ज्यामध्ये त्याला संसर्ग झाल्याचे आढळून आले होते. पण 1 जुलैपासून सुरू होणाऱ्या कसोटी सामन्यापूर्वी तो बरा होईल, अशी आम्हाला आशा आहे.
प्रशिक्षक राहुल द्रविड, कर्णधार रोहित शर्मा, ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यर वगळता सर्व खेळाडू 16 जून रोजी लंडनला पोहोचले होते. त्याचवेळी 18 जून रोजी रोहित लंडनला पोहोचला. आता सर्व खेळाडू लीसेस्टरला पोहोचले आहेत. येथे टीम इंडिया 24 जूनपासून कौंटी टीम लीसेस्टरविरुद्ध चार दिवसीय सराव सामना खेळणार आहे. द्रविड, श्रेयस आणि पंत हे प्रशिक्षक सोमवारी लीसेस्टरमध्ये दाखल झाले.