योग जीवनाचा केवळ हिस्सा नाही तर जगण्याची पद्धत –मोदी

आजचा २१ जूनचा आठवा आंतरराष्ट्रीय योग दिवस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मैसूरच्या राजवाडा मैदानावर सुमारे १५ हजार नागरिकांच्या सह साजरा केला. या कार्यक्रमात अनेक केंद्रीय मंत्री सहभागी झाले होते. कार्यक्रमाच्या सुरवातीला मोदी यांनी दिलेल्या संदेशात ‘योग हा केवळ जीवनाचा हिस्सा नाही तर ती आयुष्य जगण्याची एक प्राचीन पद्धत आहे’ असे सांगितले. पंतप्रधान सध्या कर्नाटक दौऱ्यावर आहेत. आठव्या आंतरराष्ट्रीय योग दिवसांच्या पंतप्रधानांनी सर्व जनतेला शुभेच्छा दिला आहेत. जागतिक पातळीवर यंदा या दिवसासाठी ‘ योग फोर ह्यूमॅनिटी’ म्हणजे मानवतेसाठी योग अशी थीम ठरविली गेली आहे.

पंतप्रधान मोदी यांनी २०१४ साली पंतप्रधान पदाची सूत्रे हाती घेतल्यावर सर्वप्रथम संयुक्त राष्ट्र संघात जागतिक योग दिवस साजरा व्हावा असा प्रस्ताव ठेवला होता आणि त्याला मान्यता देताना २१ जून हा दिवस त्यासाठी निवडला. २१ जून २०१५ रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा झाला तेव्हा भारताने त्याचे नेतृत्व केले होते. दिल्लीच्या राजपथावर या कार्यक्रमात ८४ देशांच्या प्रतिनिधींसह ३५ हजार नागरिक सहभागी झाले आणि त्याची नोंद गिनीज बुक मध्ये केली गेली.

योग दिवसासाठी २१ जून हा दिवस ठरविण्यामागे एक वैज्ञानिक कारण आहे. उत्तर गोलार्धात हा सर्वात मोठा दिवस असतो. या दिवशी सर्वाधिक वेळ सूर्यकिरणे पृथ्वीवर राहतात. सूर्य हा माणसाच्या आरोग्य आणि जीवनाशी जोडला गेलेला आहे. योग केल्याने दीर्घायुष्य लाभते हे सिद्ध झाले आहे. यंदाच्या योग दिवसानिमित्त भारतात ७५ ऐतिहासिक स्थळांवर योग कार्यक्रम आयोजित केले गेले होते.