असे होते पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद
देशात १८ जुलै रोजी राष्ट्रपती पदासाठी मतदान होणार असून विरोधी पक्ष एकजुटीने उमेदवार उभा करण्याच्या हालचाली करत आहेत. मात्र विरोधी गटाने ज्यांना ज्यांना या साठी निवडले त्या सर्वांनी ही निवडणूक लढवायला नकार दिला आहे. त्यात राष्ट्रवादीचे शरद पवार, काश्मिरी नेते फारूक अब्दुल्ला आणि गोपाळकृष्ण गांधी यांचा समावेश आहे. परिणामी २१ जून रोजी पुन्हा एकदा विरोधी पक्ष नवीन नावासाठी एक बैठक घेणार आहेत.
या पार्श्वभूमीवर स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्या विषयी थोडे जाणून घेणे योग्य ठरेल. स्वातंत्र्यलढ्यात उतरण्यापूर्वी राजेंद्र प्रसाद बिहार मधील अतिशय नावाजलेले वकील होते मात्र म. गांधी यांच्या सहवासात आल्यावर त्यांचे जीवन आमुलाग्र बदलून गेले. १९५० मध्ये राष्ट्रपती बनल्यावर त्यांनी प्रथम तत्कालीन व्हॉइसरॉय हाउस मध्ये जाण्यास नकार दिला होता. मात्र नंतर ते जेव्हा तेथे राहायला गेले तेव्हा या इमारतीचे नामकरण राष्ट्रपती भवन असे केले गेले. त्यावेळी राजेन्द्रप्रसाद यांना १० हजार रुपये वेतन मिळत असे मात्र त्यातील केवळ ५० टक्केच वेतन ते घेत आणि बाकी रक्कम सरकारी निधी मध्ये जमा करत असत.
राजेंद्रप्रसाद यांची राहणी अतिशय साधी आणि काटकसरीची होती. त्यांनी व्यक्तीगत स्टाफ म्हणून केवळ एक व्यक्ती ठेवली होती आणि राष्ट्रपती भवन मध्ये त्यांच्याकडे स्वयंपाकी नव्हता. राजेंद्रप्रसाद यांच्या पत्नीच रोजचा स्वयंपाक करत असत. जमिनीवर बसून राष्ट्रपती भोजन करत असत. इतकेच नव्हे तर त्यांच्या नातींच्या लग्नात त्यांनी कुणाकडूनही आहेर घेतले नाहीत आणि लग्नाची साडी स्वतः विणून नातीला दिली होती. निवृत्त झाल्यावर सुद्धा राजेंद्रप्रसाद निवृत्तीवेतनातील २५ टक्केच रक्कम स्वीकारत असत. त्यांनी त्यांचे उर्वरित आयुष्य पटना येथे अतिशय साधेपणाने व्यतीत केले होते.
देशाचे दुसरे राष्ट्रपती बनलेले डॉ. राधाकृष्णन हेही वेतनातील फक्त २५ टक्के रक्कम घेत असत आणि ७५ टक्के रक्कम पंतप्रधान कोषात देत असत. १९६२ ते ६७ या काळात ते राष्ट्रपती होते आणि या काळात ६२ चे चीन बरोबर आणि ६५ चे पाकिस्तान बरोबर अशी दोन मोठी युद्धे भारताला लढावी लागली होती. देशाचे सहावे राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी हे सुद्धा राष्ट्रपदी पदावर असताना वेतनातील फक्त ३० टक्के रक्कम घेत असत आणि ७० टक्के रक्कम सरकारी निधी मध्ये जमा करत असत असे सांगतात.