Kupwara Encounter Update : सुरक्षा दलांना मोठे यश, कुपवाडा चकमकीत चार दहशतवादी ठार


जम्मू – जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा सुरक्षा दलाला मोठे यश मिळाले आहे. रविवारपासून सुरू असलेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी चार दहशतवाद्यांना ठार केले आहे. घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात दारूगोळा जप्त करण्यात आला आहे.

जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुपवाडा येथे झालेल्या चकमकीत आणखी दोन दहशतवादी ठार झाले आहेत. या चकमकीत आतापर्यंत एकूण 4 दहशतवादी मारले गेले आहेत. घटनास्थळावरून घातक साहित्य, शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. सध्या शोधमोहीम सुरू आहे.

पोलिसांनी सांगितले की, कुपवाडा येथील लोलाब परिसरात दहशतवादी शौकत अहमद शेख याला अटक करण्यात आली आहे. त्याच्या सांगण्यावरून दहशतवाद्यांच्या अड्ड्याचा शोध सुरू करण्यात आला. यावेळी लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी घेराव घातल्याचे पाहून गोळीबार सुरू केला. सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांना आत्मसमर्पण करण्यास सांगितले, मात्र दहशतवाद्यांनी गोळीबार सुरूच ठेवला.

सुरक्षा दलांनी प्रत्युत्तरादाखल सुरू केलेल्या चकमकीत एकामागून एक दोन दहशतवादी मारले गेले. ठार झालेला एक दहशतवादी लष्कर-ए-तैयबाचा पाकिस्तानी दहशतवादी होता. पोलिसांनी सांगितले की, अटक केलेल्या दहशतवाद्यालाही घेरण्यात आले होते, तोही दहशतवादी तळापर्यंत पोहोचला आणि त्याच्या साथीदारांसह गोळीबार सुरू केला. मात्र, सोमवारी सकाळी सुरक्षा दलांनी आणखी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. ज्यामध्ये दहशतवादी शौकत अहमद शेखचाही समावेश आहे.

याशिवाय दहशतवाद्यांच्या उपस्थितीच्या माहितीवरून कुलगाम जिल्ह्यातील दमहल हांजीपोरा भागातील गुज्जरपोरा गावात रविवारीच शोध मोहीम राबवण्यात आली. यादरम्यान दोन दहशतवादी मारले गेले. कुलगामचा झाकीर पदर आणि श्रीनगरचा हरीश शरीफ अशी त्यांची नावे आहेत.

अल-बद्रच्या तीन दहशतवाद्यांना पिस्तुल-ग्रेनेडसह अटक
दुसरीकडे, सुरक्षा दलांनी उत्तर काश्मीरमध्ये अल-बद्रच्या तीन दहशतवाद्यांना अटक करून दहशतवादी हल्ल्याचा कट उधळून लावला. त्यांच्याकडून पिस्तूल, हातबॉम्ब जप्त करण्यात आले आहेत. पाकिस्तानात बसलेल्या हँडलर्सच्या वतीने या भागातील दहशतवादी हल्ल्यांची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली होती. पोलीस या दहशतवाद्यांची चौकशी करत आहेत.

पोलिसांनी सांगितले की, राष्ट्रीय महामार्गावरील वांगम क्रॉसिंगजवळ पोलीस, सीआरपीएफ आणि लष्कर नाका लावून तपास करत होते. यावेळी तीन संशयितांना ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्यांच्याकडून एक पिस्तूल, मॅगझिन, आठ गोळ्या आणि दोन हातबॉम्ब जप्त करण्यात आले.