मुंबई – मुंबई-दिल्लीसारखी मोठी शहरे कधी झोपत नाहीत, असे म्हणतात. रात्रीच्या दरम्यान कोणत्याही वेळी लोक रस्त्यावर दिसतात. मात्र अनेक वेळा रात्री उशिरा फिरणाऱ्यांना कायदेशीर कारवाईलाही सामोरे जावे लागते. अशाच एका प्रकरणात मुंबईच्या स्थानिक न्यायालयाचा निर्णय आला आहे.
‘कर्फ्यू नसेल तर मुंबईसारख्या शहरात रात्री उशिरा बाहेर पडणे गुन्हा नाही’, न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
रात्री उशिरा फिरणे आणि चेहरा लपवणे या प्रकरणाची सुनावणी करताना न्यायालयाने आरोपींची निर्दोष मुक्तता केली. तसेच न्यायालयाने आपल्या निर्णयात नोंदवलेली निरीक्षणेही अत्यंत महत्त्वाची आहेत. वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, मुंबईसारख्या शहरात कर्फ्यू नसेल, तर रात्री उशिरापर्यंत रस्त्यावर फिरणे हा गुन्हा नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे.
काय होते प्रकरण?
ही घटना दक्षिण मुंबईतील आहे. 13 जून रोजी पोलिसांनी उत्तर प्रदेशमधील रहिवासी 29 वर्षीय सुमित कश्यपविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. सुमित रस्त्यावर बसला होता आणि त्याने रुमालाने तोंड झाकण्याचा प्रयत्न केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. त्यानंतर महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम 122-ब अंतर्गत तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
जेव्हा कोणी गुन्हा करण्याच्या उद्देशाने सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या दरम्यान चेहरा झाकतो, तेव्हा हे कलम लागू होते. हे प्रकरण मुंबईतील गिरगाव महानगर दंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात पोहोचले असता येथे पोलिस अपयशी ठरले. न्यायालयाने 16 जून रोजी निकाल देताना आरोपींची निर्दोष मुक्तता केली.
आपल्या आदेशात न्यायालयाने असे म्हटले
हा आदेश देताना न्यायदंडाधिकारी नदीम पटेल म्हणाले, आरोपीला रात्री दीडच्या सुमारास अटक करण्यात आली. मुंबईसारख्या शहरात रात्री दीडची वेळ एवढी उशीर होत नाही. रस्त्यावर कोणीही उभे राहू शकते, त्यामुळे गुन्हा करण्यासाठी चेहरा लपवण्यात आला होता, असे मानता येणार नाही. पुढे, न्यायालयाने म्हटले की, रात्री 1.30 ची वेळ खूप उशिरा आहे, असे गृहीत धरले तरी, कर्फ्यू लागू नसेल तर रस्त्यावर फिरणे हा गुन्हा नाही. मुंबईत रात्री कर्फ्यू नसल्याने आरोपी रस्त्यावर उभे राहिल्यास तो गुन्हा नाही.
‘लोक मास्क म्हणून वापरत आहेत रुमाल’
वास्तविक, आरोपीने रुमालाने तोंड लपवल्याचा युक्तिवाद पोलिसांनी केला होता. न्यायालयाने हा युक्तिवाद बाजूला ठेवला. कोर्टाने म्हटले की, हा कोरोनाचा काळ आहे आणि लोक सुरक्षिततेसाठी मास्क घालतात. जरी, मास्क आवश्यक नाही, परंतु मास्क घालण्याचा सल्ला आहे. जर कोणाकडे मास्क नसेल, तर तो मास्क म्हणून रुमाल वापरतो. त्यामुळे जर आरोपीने मास्क म्हणून रुमाल वापरला असेल तर त्याचा अर्थ त्याने आपली ओळख लपवली असा होत नाही. कोर्टात आरोप सिद्ध करण्यासाठी पोलिस कोणतेही ठोस कारण देऊ शकले नाहीत, त्यानंतर कोर्टाने आरोपींची निर्दोष मुक्तता केली.