येथे शेतकरी कोंबड्यांना देताहेत भांग

थायलंड सरकारने भांग संदर्भातील नियम थोडे शिथिल केले असून भांग घेणे हा या देशात आता गुन्हा मानला जाणार नाही. अशी परवानगी देणारा थायलंड हा आशियातील पहिला देश बनला असतानाच येथील शेतकरी आत्ता पाळीव कोंबड्यांना भांग देऊ लागल्याचे समोर आले आहे. सरकारने ८ जून रोजी देशात भांगेची शेती करण्यास परवानगी दिली आहे.अर्थात त्यासाठी काही अटी घातल्या आहेत. या शेतीसाठी शेतकऱ्याला रीतसर परवानगी घ्यावी लागणार आहे. दरम्यान शेतकरी कोंबड्यांना भांग देत असल्याच्या बातम्या आल्या असून या साठी दिले गेलेले कारण मजेदार आहे.

कोंबड्यांना भांग देण्याची लिंक अँटीबायोटिक्स बरोबर जोडली गेली आहे. कोंबड्यांना अँटीबायोटीक्स द्यावी लागू नयेत म्हणून त्यांना भांग दिली जात असल्याचे सांगितले जात आहे. पॉट पोल्ट्री या नावाने हा उपक्रम सुरु केला गेला आहे. भांगेचा आहारात समावेश केल्याने कोंबड्यांना आजारापासून संरक्षण मिळते असे म्हटले जात आहे. येथील कोंबड्यांना अँटीबायोटिक्स देऊनही त्यांना एवियन ब्रोन्कायटीस झाला होता. त्याबाबत चीयांग माई विद्यापीठातील संशोधकांनी केलेल्या संशोधनात भांग असलेले खाद्य दिले गेले तर हा रोग होण्याचा धोका कमी होत असल्याचे दिसून आले असे समजते.

यामुळे शेतकरी कोंबड्यांना भांगेची पाने, भांग पाण्यात मिसळून देऊ लागले आहेत. सध्या १ हजार कोंबड्यांवर हा प्रयोग सुरु आहे. भांग दिल्याने कोंबडीच्या वर्तनात कोणताही फरक पडलेला नाही तसेच कोंबडीचे मांस व अंडी यावरही कोणताही परिणाम दिसून आलेला नाही. भांग प्रमाणात दिल्यास औषधाचे काम करते हे या पूर्वीच सिद्ध झाले आहे आणि थायलंड मध्ये दीर्घकाळ भांगेचा खाद्यपदार्थात वापर केला जात आहे असेही समजते.