अमेरिकेत गन खरेदीत महिला आघाडीवर

अमेरिकेत गेल्या काही महिन्यात सातत्याने सार्वजनिक ठिकाणी गोळीबाराच्या घटना घडत असल्याने पुन्हा एकदा तेथील गन कल्चर चर्चेत आले आहे. अमेरिकन बंदूक उत्पादन कंपन्यांनी गेल्या २० वर्षात झालेल्या विक्रीचा आढावा घेतला असून यात गन खरेदीत गेल्या काही वर्षात महिला आघाडीवर असल्याचे दिसून आले आहे. अर्थात वेळोवेळी या कंपन्यांनी बंदूक खरेदी का आवश्यक याविषयी वेगवेगळे पैलू समोर आणून विक्री वाढीचे प्रयत्न सातत्याने केले असल्याचेही दिसून आले आहे.

या उत्पादकांनी वेळोवेळी स्वाभिमान, मर्दानगी, भीतीची भावना यांचा बाजार मांडून बंदूक विक्री वाढवली आहे मात्र सध्या आत्मरक्षा हा मुद्दा पुढे आणला गेला असून त्यासंदर्भात सातत्याने जाहिराती केल्या जात आहेत. यात बंदूक हाती घेतलेल्या महिला प्रामुख्याने दाखविल्या जात आहेत. परिणामी २००० या वर्षात ८५ लाख गन्स विकल्या गेल्या होत्या ते प्रमाण गतवर्षी ३ कोटी ८९ लाखांवर गेले आहे आणि यात महिलांची संख्या अधिक आहे.

गनउत्पादक, वकील आणि लोकप्रतीनिधी यांनी अमेरिकेतील प्रचंड मोठ्या वर्गाला ‘एक तरी गन हवीच’ असा भरोसा देण्याचे काम केले आहे. २०१२ पासून गन विक्रीतील वाढ सातत्याने अधिक असून गोळीबाराच्या घटना सतत घडत असल्याने नागरिकांत असुरक्षित भावना वाढीस लागली आहे आणि त्याचा परिणाम म्हणून स्वतःचे शस्त्र हवे अशी नागरिकांची मनोधारणा झाली आहे असे दिसून आले आहे. गतवर्षी गन खरेदी करणाऱ्यांत ४० वयोगट आणि गोरे पुरुष यांचे प्रमाण वाढले होते आणि त्यांनी हँडगन ला विशेष पसंती दिली होती असेही निरीक्षण नोंदविले गेले आहे.