आता सायकलवरून पडले जो बायडेन

अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्या मागे लागलेली पडापडी संपण्याचे नाव घेत नाही असे दिसते आहे. लग्नाचा ४५ वा  वाढदिवस शुक्रवारी साजरा करून कुटुंबासह दीर्घ सुट्टीवर असलेले बायडेन डेलावेर समुद्रकिनारी हेन लोपेन स्टेट पार्क मध्ये सायकल सैर करत असताना सायकलवरून पडल्याचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. या अपघातात त्यांना कोणतीही इजा झालेली नाही असे सांगितले गेले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार बायडेन परिवारासह सुट्टी साजरी करत आहेत. दरम्यान सायकलिंग करत असताना ते सायकलवरून उतरले पण अचानक त्यांचा तोल गेल्याने सायकलसह पडले. सुरक्षारक्षकांचा आधार घेऊन ते त्वरित उभे राहिले. रक्षकांना बायडेन यांनी ‘मी ठीक आहे’ असे सांगितले. व्हाईट हाउसकडून बायडेन यांना झालेल्या या अपघाताला दुजोरा दिला गेला आहे मात्र बायडेन यांना कोणत्याही खास उपचारांची आवश्यकता नाही असेही स्पष्ट केले गेले आहे. बायडेन आणखी काही दिवस सुट्टीवर राहणार आहेत.

गेले काही महिने बायडेन यांचे अनेक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत. परवाच विमानाच्या शिडीवर पडल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. बायडेन हे अमेरिकेचे आत्तापर्यंतचे सर्वात वयोवृद्ध राष्ट्राध्यक्ष आहेत. २०२४ मध्ये ते पुन्हा राष्ट्राध्यक्ष निवडणूक लढविणार असल्याचे सांगितले जात आहे.