अग्निवीराना सामावून घेणार महिंद्रा- आनंद महिन्द्रांचे ट्वीट
देशातील आघाडीचे उद्योजक महिंद्र अँड महिंद्र समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्र यांनी केंद्र सरकारने लागू केलेल्या ‘अग्निपथ’ योजनेअंतर्गत प्रशिक्षण घेणाऱ्या अग्नीवीरांना महिंद्र ग्रुप मध्ये रोजगार दिला जाईल असे ट्वीट केले आहे. ही योजना लागू केल्यापासून देशभरातील अनेक राज्यात हिंसाचार भडकला असून विरोधी पक्षांनी त्याला जोरदार विरोध केला आहे. सोमवारी या विरोधात ‘भारत बंद’ चे आवाहन केल्याच्या पार्श्वभूमीवर महिंद्र यांचे हे ट्वीट विशेष लक्षात येत आहे.
आनंद महिंद्र म्हणतात, ‘ अग्निवीर योजनेला होत असलेल्या विरोधाचे दुःख आहे. गतवर्षी ही योजना समोर आली तेव्हाच मी सांगितले होते आणि आज परत सांगतो की, अग्निवीराना या योजनेतून जे प्रशिक्षण मिळणार आहे, जी कौशल्ये आत्मसात होणार आहेत त्यामुळे त्यांना रोजगाराच्या चांगल्या संधी प्राप्त होणार आहेत. जे अग्निवीर या योजनेतून प्रशिक्षण घेतील त्या सक्षम युवकांचे आमच्या कंपनीत स्वागत आहे. आम्ही त्यांना आमच्या कंपनीत सामावून घेण्यास तयार आहोत.’
महिंद्र यांच्या या ट्वीटचे तमाम जनतेने स्वागत केले आहे. महिंद्र यांना या अग्निवीराना काय संधी आहेत असे विचारले गेले तेव्हा ते म्हणाले,’ लीडरशिप, टीमवर्क, फिजिकल ट्रेनिंग या योजनेतून दिले जाणार आहे आणि यामुळे आज बाजाराला आवश्यक असेलेले प्रोफेशनल त्यातून मिळणार आहेत. उद्योगसमूहात संचालन, प्रशासन, सप्लायचेन अशी अनेक क्षेत्रे त्यांना खुली आहेत. चार वर्षाच्या प्रशिक्षणानंतर २५ टक्के लोकांना सेनेत घेतले जाणार आहे आणि सशत्र दलात त्यांच्यासाठी आरक्षण ठेवले गेले आहे. उद्योगक्षेत्रात सुद्धा त्यांना संधी आहेत.’
विरोधकांनी या योजनेमुळे बेरोजगारी वाढेल, तरुणांच्या करियरचे नुकसान होईल असे मुद्दे मांडले असले तरी युपी, मध्यप्रदेश, हरियाना, उत्तराखंड, कर्नाटक, आसाम, अरुणाचल सरकारांनी अग्निवीराना सरकारी नोकरीत प्राधान्य दिले जाईल अशी घोषणा केली आहे.