नवी दिल्ली – केंद्र सरकारने मतदार यादीशी आधार लिंक करण्यासाठी अधिसूचना जारी केली आहे. याबाबत सरकारने शुक्रवारी चार अधिसूचना जारी केल्या. याअंतर्गत मतदार यादीशी आधार लिंक करणे, सेवा मतदारांसाठी मतदार यादी लिंग-सुसंगत करणे याशिवाय तरुण मतदारांना वर्षातून एकऐवजी चार वेळा मतदार यादीत नाव नोंदवण्याची संधी मिळणार आहे.
मतदार यादीशी आधार कार्ड लिंक करण्यासाठी अधिसूचना जारी, तरुणांना नावनोंदणीसाठी वर्षभरात चार संधी
तसेच, आयोग आता निवडणूक संबंधित साहित्य ठेवण्यासाठी आणि सुरक्षा दल आणि निवडणूक कर्मचाऱ्यांसाठी कोणत्याही इमारतीची मागणी करू शकतो. संसदेने पारित केलेल्या निवडणूक सुधारणा कायदा 2021 अंतर्गत ही अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
कायदा मंत्री किरेन रिजिजू यांनी ट्विटरवर लिहिले की, निवडणूक आयोगाशी सल्लामसलत केल्यानंतर या संदर्भात चार अधिसूचना जारी करण्यात आल्या आहेत. केंद्रीय मंत्र्यांनी एक तक्ताही शेअर केला आहे, ज्यामध्ये असे नमूद केले आहे की, यामुळे एकाच व्यक्तीला एकाहून अधिक ठिकाणी मतदार यादीत नाव नोंदवण्यापासून रोखले जाईल. रिजिजू म्हणाले की, आता 1 जानेवारी किंवा 1 एप्रिल किंवा 1 जुलै किंवा 1 ऑक्टोबर रोजी 18 वर्षे पूर्ण होणारे तरुण मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी तत्काळ अर्ज करू शकतात.