चालत्या ट्रेनमध्ये महाराष्ट्राचे आमदार किशोर जोरगेवार यांचा मोबाईल चोरीला, एसी फर्स्ट क्लास रेल्वे डब्यातून प्रवास


मुंबई : रेल्वेच्या एसी फर्स्ट क्लासमधून प्रवास करणारे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांचे दोन्ही फोन चोरीला गेले आहेत. शुक्रवारी सकाळी मुंबईत पोहोचल्यानंतर जोगरेवार यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यासोबतच त्यांनी रेल्वेमंत्र्यांना पत्रही लिहिले. पोलिसांत तक्रार केल्यानंतर त्यांनी मोबाईल कंपन्यांमध्ये नवीन सिमकार्डसाठी अर्ज केला आहे. त्याचवेळी, आरोपींची ओळख पटवण्यासाठी पोलीस स्थानकांवर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचीही छाननी करत आहेत.

चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार हे पंढरपूरहून मुंबईला येत होते. पत्रकारांशी बोलताना जोरगेवार म्हणाले की, ते पंचायत राज दौऱ्यावर होते. दौरा आटोपल्यानंतर त्यांनी पंढरपूरहून मुंबईला जाण्यासाठी ट्रेन पकडली. जोरगेवार कुर्डुवाडी रेल्वे स्थानकावरून सिद्धेश्वर एक्स्प्रेसमध्ये चढले. रात्री झोपताना त्यांनी मोबाईल चार्जिंगला लावला, मात्र सकाळी त्यांचे दोन्ही फोन गायब होते.

जोगरेवार यांनी दुसऱ्याच्या फोनवरून त्यांच्या मोबाइलवर कॉल केला, तेव्हा क्रमांक बंद असल्याचे आढळून आले. त्यानंतर त्यांचे फोन चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. रेल्वेच्या एसी फर्स्ट क्लासमधून आपला फोन चोरीला जाईल याची कल्पना नसल्याबद्दल जोगरेवार यांनी आश्चर्य व्यक्त केले.