मोदींची मातृवंदना, पायाचे तीर्थ घेऊन घेतले आशीर्वाद
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मातोश्री हिराबेन यांच्या शतकी वाढदिवशी अहमदाबाद येथे घरीच हिराबा यांचे पाय धुवून त्यांना मातृवंदना दिली. आईच्या पायाचे तीर्थ डोळ्यांना लावून मोदींनी आईच्या अंगावर शाल पांघरली आणि त्यांना मिठाई भरवली. हिराबेन यांनी लेकाचे तोंड गोड करून त्यांना शुभाशीर्वाद दिले.
मोदी यांच्या फिटनेसची चर्चा नेहमीच होत असते. ते गुजराथचे मुख्यमंत्री होते तेव्हा परदेशात सुद्धा त्यांचा फिटनेस हा चर्चेचा विषय होता. मोदींना हा वारसा हिराबेन यांच्या कडून मिळाला आहे असे प्रल्हाद मोदी यांनी सांगितले. आई हिराबेन यांच्या फिटनेस बद्दल बोलताना ते म्हणाले, ही मोदी परिवाराची परंपरा आहे.
भरपूर कष्ट, मिताहार आणि सकारात्मक विचार ही हिराबेन यांच्या निरोगी प्रकृतीची त्रिसूत्री आहे असे सांगून प्रल्हाद मोदी म्हणाले, १०० वर्षाच्या आयुष्यात त्या कधीही डॉक्टरकडे गेलेल्या नाहीत. किरकोळ आजारावर घरगुती उपचार करतात. त्यांच्या आठवणीत त्यांनी कधीही बाहेरचे जेवणच काय पण नाश्ता सुद्धा घेतलेला नाही. सकाळपासून रात्री झोपेपर्यंत त्यांचा दिनक्रम व्यस्त असतो. पहाटे लवकर उठणे, रोजची पूजा अर्चा, सकाळी चहा पोळीचा नाश्ता, दुपारी भाजी, भात रोटी असे साधे जेवण आणि रात्री फक्त खिचडी असा त्यांचा आहार असून रात्री त्या लवकर झोपतात. स्वतःची सर्व कामे स्वतः करतात.
हिराबेन मनाने धार्मिक प्रवृत्तीच्या आहेत. दिवसा थोडे फिरणे आणि धार्मिक नियम पालन करण्याबाबत त्या जागरूक असतात असेही त्यांनी सांगितले.