पाकिस्तानी एक दिवसाचा चहा सोडून वाचवू शकतात २६ कोटी रुपये

आर्थिक संकटात अडकलेल्या पाकिस्तानचे मंत्री अहसान इक्बाल यांनी देशातील लोकांनी कमी चहा प्यावा असा सल्ला दिल्यावर त्यांची मिडिया मध्ये खिल्ली उडविली गेली असली तरी त्यांनी दिलेला सल्ला अनेक कारणांनी योग्य असल्याचे अधिक माहिती घेताना दिसून आले आहे. पाकिस्तानात लोकांना चहा पिण्यासाठी पैसे नाहीत अशी खिल्ली मिडियामधून उडविली गेली असली तरी प्रत्यक्षात मात्र खरोखरच पाकिस्तान नागरिकांनी एक दिवसाचा चहा सोडला तर देशाचे २६ कोटी रुपये वाचतात असे आकडेवारी सांगते.

मंत्री इक्बाल यांनी नागरिकांनी दिवसात १-१, २-२ कप चहा कमी प्यावा असा सल्ला दिला होता. पाकिस्तानची आर्थिक स्थिती आणि चहा यांचा काय संबंध असे कुणाला वाटेल. पण पाकिस्तान हा जगातील सर्वात मोठा चहा आयातदार देश आहे. २२ कोटी लोकसंखेच्या या देशात २०२० मध्ये ५९० दशलक्ष डॉलर्स म्हणजे १२० अब्ज रुपये चहा आयातीवर गेले आहेत तर २०२१-२२ मध्ये ८२ अब्ज रुपये आत्ताच खर्ची पडले आहेत. पाकिस्तान चहा उधारीवर आयात करत आहे असेही समजते.

देशाचे परकीय चलन गंगाजळी खालावली असून सध्या फक्त १० अब्ज डॉलर्स शिल्लक आहेत आणि त्यात फक्त पुढच्या दोन महिन्याचे सामान आयात होऊ शकते. नॅशनल टी अँड हाय व्हॅल्युएशन इन्स्टीटयूटच्या आकडेवारी नुसार पाकिस्तानात दर सेकंदाला ३ हजार कप चहा प्यायला जातो. दररोज २६ कोटी कप, महिना ७७० कोटी कप तर वर्षाला ९३०० कोटी कप असे हे प्रमाण आहे. गेली काही वर्षे वार्षिक दर माणशी चहा खप १ किलोच राहिला आहे पण लोकसंख्या वाढीमुळे मागणी वाढली आहे.

जून मध्ये पाकिस्तानात चहाचा दर किलोला ८५० रुपये आहे. चहा दुकानात एक कप चहासाठी ४५ रुपये द्यावे लागतात. पाकिस्तानात फक्त ५० हेक्टर जमिनीवर चहा मळे आहेत आणि त्यात फक्त १० टन चहा उत्पादन होते आणि वार्षिक खप मात्र २ लाख टन आहे. पाकिस्तानात ब्लॅक टी, ग्रीन टी, हॉट टी, मिठा टी, कोल्ड टी, नमकीन टी, मसालेदार टी असे सर्व प्रकारचे चहा प्यायले जातात मात्र उकळत्या दुधात चहा पावडर टाकून केलेला चहा सर्वाधिक लोकप्रिय आहे.