असे आहे जगातील सर्वाधिक पावसाचे मौसीनराम गाव
मेघालयातील मौसीनराम गावात जगात सर्वाधिक पाउस पडतो. याच गावात गुरुवारी म्हणजे १६ जून रोजी चोवीस तासात तब्बल १००३ मिली पाउस पडला आणि या गावाचे नवे रेकॉर्ड नोंदविले गेले. यापूर्वी मेघालय मधील चेरापुंजी ही जगात सर्वाधिक पाउस पडणारे ठिकाण होते पण गेली काही वर्षे मौसीनराम मध्ये चेरापुंजी पेक्षा अधिक पाउस होत आहे. चेरापुंजी पासून जवळच हे गाव आहे आणि सर्वाधिक आर्द्रता असलेले गाव म्हणून त्यांची गिनीज बुक मध्ये नोंद झाली आहे.
दरवर्षी या गावात सरासरी ११८७१ मिमी पाउस पडतो. १९८५ मध्ये मौसीनराम मध्ये २६ हजार मिमी पाउस कोसळला आणि या गावाचे नाव एकदम जगाच्या नकाशावर झळकले. गेली ३० वर्षे मौसीनराम आणि चेरापुंजी ही जगातील सर्वाधिक पाउस पडणारी दोन गावे म्हणून नोंदली गेली आहेत.
प्रश्न असा पडतो कि इतका पाउस कोसळणाऱ्या गावात लोक राहतात कसे? या गावात अति पावसामुळे शेती करणे शक्य होत नाही. त्यामुळे दुसऱ्या गावातून गरजेचे सामान प्लास्टिक मध्ये बांधून आणावे लागते आणि ड्रायरने ते सुकवून त्याची विक्री करावी लागते. येथील लोक बांबू पासून बनविलेली छत्री वापरतात त्याला कनूप असे म्हटले जाते. लोक कामावर जाताना रेनकोट घालूनच जातात.
अति पावसामुळे रस्ते खराब होतात त्यामुळे येथील स्थानिकांचा बराच वेळ रस्ते देखभालीत जातो. येथील आयुष्य खडतर आहे. पूल अति पावसाने नेहमी जर्जर अवस्थेत असतात. झाडांची मुळे एकमेकांना बांधून पूल तयार होतात. रबर आणि बांबू पासून पूल बनविले जातात ते पाण्याने फार लवकर खराब होत नाहीत.
आयुष्य खडतर असले तरी येथे निसर्गाने मुक्त हस्ते सौंदर्य वाटले आहे. उंच डोंगर रांगा, त्यातून अहोरात्र फेसाळत कोसळणारे धबधबे, चोहो बाजूनी गर्द हिरवी झाडे, शुद्ध हवा आणि खाली उतरून आलेले ढग, अतिशय प्रामाणिक आणि साधी माणसे येथे आहेत. येथून जवळ अनेक सुंदर पर्यटन स्थळे असून त्यात लवण स्तंभ गुहा हे विशेष आकर्षण आहे.