अचानक परदेशी स्थायिक चीनी नागरिक विकू लागले मालमत्ता
रशिया युक्रेन युद्धाला तीन महिन्यापेक्षा अधिक काळ लोटला असताना त्याचे थेट दुष्परिणाम चीनवर दिसू लागले आहेत. परदेशात स्थायिक झालेले चीनी नागरिक अचानक त्यांच्या मालमत्ता विकू लागले असून चीन कम्युनिस्ट पार्टीनेच त्यांना असे आदेश दिल्याचे सांगितले जात आहे. अनिवासी चीनी लोकांना कम्युनिस्ट पार्टीने संपत्ती विका आणि मायदेशी परत या असे आदेश दिले आहेत आणि यासाठी रशिया युक्रेन युध्द हेच कारण सांगितले जात आहे.
रशियाला धडा शिकविण्यासाठी पाश्चिमात्य देशांनी एकजूट केली असून त्याचा फटका त्या त्या देशात राहणाऱ्या चीनी नागरिकांना बसला आहे. या देशांनी त्यांच्या देशात राहणाऱ्या श्रीमंत चीनी लोकांची संपत्ती जप्त केली असून विभिन्न कंपन्यातील त्यांचे शेअर आणि बँक खात्यावर बंदी आणली आहे. परिणामी प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष रुपात दरवर्षी चीन मध्ये या लोकांकडून पाठविले जाणारे परदेशी चलन येऊ शकलेले नाही. भविष्यात चीनने तैवानवर लष्करी कारवाईची घोषणा केली तर सर्व प्रथम त्याचा फटका परदेशी राहणाऱ्या चीनी नागरिकांना बसणार हे स्पष्ट आहे. अश्या परिस्थितीत अमेरिका, ब्रिटन चीनला मोठा आर्थिक धक्का देऊ शकतात आणि हा धक्का युद्धात भारी पडेल असे सांगितले जात आहे.
एच के पोस्टने दिलेल्या रिपोर्ट नुसार परदेशात स्थायिक अनेक चीनी नागरिकांनी त्यांच्या मालमत्ता विकायला सुरवात केली आहे. कम्युनिस्ट पार्टीने परदेशात पत्नी, मुले यांच्या नावाने संपत्ती खरेदी केलेल्या सर्व पार्टी नेत्यांना आणि सरकारी अधिकाऱ्यांना त्यांच्या बढत्या थांबविणार असल्याचे इशारे दिले आहेत. २०१४ मध्ये ३२०० पेक्षा अधिक अधिकाऱ्यांनी परिवारच्या नावाने परदेशात संपत्ती खरेदी करून संधी मिळताच परदेशात पलायन करण्याची केलेली तयारी उघड झाली होती असेही समजते.