स्विस बँकात या वर्षात भारतीयांच्या पैशात ५० टक्के वाढ

स्विस बँकातून भारतीय कंपन्या तसेच अन्य संस्था आणि वैयक्तिक ठेवीमध्ये या वर्षात २०२० च्या तुलनेत ५० टक्के वाढ झाली असून गेल्या १४ वर्षातील ही उच्चतम वाढ आहे असे समजते. मात्र हा काळा किंवा करचुकवेगिरी साठी जमा केलेला पैसा नाही असा खुलास स्वित्झर्लंडची राष्ट्रीय बँक एसएनबी कडून केला गेला आहे. या बँकेने गुरुवारी ग्राहकांच्या ठेवींबाबतची आकडेवारी जाहीर केली त्यानुसार भारतीयांनी स्विस बँकेत ३०५०० कोटी (३.८३ अब्ज स्विस फ्रँक्स) जमा केले आहेत. यात भारतातील विविध स्विस बँक खात्यात शिवाय विविध स्विस वित्तीय संस्थात जमा असलेल्या रकमेचा समावेश आहे. २०२० मध्ये स्विस बँकातून भारतीयांची जमा असलेली रक्कम २.५५ अब्ज स्विस फ्रँक्स म्हणजे २०७०० कोटी रुपये होती.

दुसरीकडे भारतीय ग्राहकांनी बचत वा जमा खात्यात ठेवलेली रक्कम गेल्या दोन वर्षात घसरली होती मात्र २०२१ मध्ये सुमारे ४८०० कोटींची रक्कम जमा केली गेली आहे. या रकमेत जे भारतीय किंवा प्रवासी भारतीय स्विस बँकेत कुठल्या तरी तिसऱ्या देशातील संस्थांच्या नावावर ठेवी जमा करतात त्या रकमेचा समावेश नाही असा खुलासा केला गेला आहे. स्विस बँकेच्या म्हणण्यानुसार भारतीयांचे स्विस बँकेत जमा केलेले धन काळा पैसा नाही. करचोरीविरुद्धच्या भारत सरकाच्या लढाईत स्विस बँक भारताला सक्रीय समर्थन देत आहे.

स्विस बँकांतून सर्वाधिक धन जमा असलेल्या देशांत ब्रिटन (३७९ अब्ज स्विस फ्रँक्स), अमेरिका १६८ अब्ज स्विस फ्रँक्स यांचा समावेश आहे. स्विस बँकेत धन असलेल्या टॉप टेन देशात वेस्ट इंडीज, जर्मनी, फ्रांस, सिंगापूर, हॉंगकॉंग, बहामाज, नेदरलंड, केमन आयलंड आणि सायप्रस यांचा समावेश असून भारताचे स्थान या यादीत ४४ वे आहे.