शी जिनपिंग झाले ६९ वर्षांचे- खडतर परिस्थितीत झालाय आयुष्याचा प्रवास

चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी वयाची ६९ वर्षे बुधवारी पूर्ण केली आहेत. वास्तविक चीन मध्ये आजपर्यंत झालेल्या सर्व राष्ट्रपतींनी ६८ वर्षे पूर्ण झाल्यावर राष्ट्रपतीपद सोडले आहे पण शी जिनपिंग हा नियम मोडून तिसऱ्या वेळी राष्ट्रपती होतील असे संकेत दिले गेले आहेत. परंपरेनुसार चीनी नेते सार्वजनिक स्तरावर वाढदिवस साजरा करत नाहीत. पण रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांनी फोन करून शी जिनपिंग यांचे अभीष्टचिंतन केले आहे.

शी जिनपिंग यांच्या राष्ट्रपती पदाची १० वर्षे पूर्ण झाली आहेत. शी जीनपिंग यांचा राष्ट्रपतीपदापर्यंतचा प्रवास खडतर म्हणावा असा आहे. त्यांचे बालपण गरिबीत गेले आणि १५ वर्षे त्यांनी खेड्यात शेती मध्ये घालविली. येनान येथे त्यांचे वास्तव्य होते आणि आईवडील गरीब शेतमजूर होते. चीनच्या गृहयुद्धात हे गाव कम्युनिस्ट लोकांचा गढ बनले आणि आजही लाल क्रांतीची ही पवित्र भूमी मानली जाते. या गावात आजही कोणत्याही आधुनिक सुविधा केल्या गेलेल्या नाहीत. जसेच्या तसे हे गाव राखले गेले आहे.

६० च्या दशकात गावात वीज नव्हती. पक्की सडक नव्हती. शेतीसाठी यंत्रे नव्हती. शी जिनपिंग यांनी स्वतः खते वाहून नेणे, बंधारे बांधणे अशी कामे केली आहेत. या काळात ते अन्य काही सोबत्यांसमवेत गुहेत राहत असत. झोपायला विटांची गादी आणि जे खायला मिळेल ते जेवण. तरी रात्री दिवटीच्या प्रकाशात ते अभ्यास करत असत. याच काळात पार्टी नेत्यांवर माओने अनेक अत्याचार केले. त्याचा फटका शी जीनपिंग यानाही बसला. आईवडिलांना तुरुंगात टाकले गेले आणि त्यांचे कुटुंब बिखरले. पण जिनपिंग यांनी हार मानली नाही. रेड गार्ड पासून लपून त्यांनी जीव वाचवला.

१८ व्या वर्षी खऱ्या अर्थाने त्यांचे करिअर सुरु झाले. ते कम्युनिस्ट युथ लीग मध्ये सामील झाले. त्यांचे लक्ष नेहमीच वरच्या पदावर होते.२०१२ मध्ये ते पार्टीचे नेते बनले आणि २०१३ मध्ये देशाचे राष्ट्रपती झाले. त्यांच्या कारकिर्दीत चीनची सुपर पॉवरच्या दिशेने वेगाने वाटचाल सुरु आहे. अश्या या चीनी नेत्याला आईस्क्रीम अतोनात प्रिय आहे. कुणी आईसक्रीम गिफ्ट केले कि त्यांना फार आनंद होतो असे सांगतात.