चुकीच्या जागी वाहन पार्किंग- फोटो पाठवा,५०० रुपये मिळवा- गडकरी
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि राजमार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केंद्र सरकार एका नवा कायदा आणण्याचा विचार करत आहे असे दिल्ली मध्ये एका कार्यक्रमात बोलताना सांगितले. हा कायदा वाहतूक नियम संबंधी असेल असे सांगून गडकरी म्हणाले, या कायद्यानुसार जी व्यक्ती चुकीच्या पद्धतीने रस्त्यावर पार्क केलेल्या वाहनाचा फोटो काढून पाठवेल तिला ५०० रुपये इनाम दिले जाईल आणि वाहन मालकाला १ हजार रुपये दंड केला जाईल.
गुरुवारी या कार्यक्रमात बोलताना गडकरी म्हणाले, देशात रस्त्यावर कशीही वाहने उभी करण्याच्या वाईट प्रवृत्तीवर नियंत्रण आणण्यासाठी असा कायदा करण्याचा सरकार विचार करत आहे. लोक वाहने खरेदी करतात पण त्यांच्या पार्किंग साठी जागा बनवत नाहीत. देशातील, शहरातील रस्ते वाहने पार्क करण्यासाठी बनविले गेले असा त्यांचा समज आहे. गडकरी म्हणाले, त्यांच्या घरी खानसामा येतो त्यांच्या कडे दोन सेकंड हँड गाड्या आहेत. चार सदस्यांच्या कुटुंबात ६ गाड्या खरेदी केल्या जातात. त्यातील बहुतेक सार्वजनिक रस्त्यांवर पार्क होतात असे दिसून आले आहे.