Team India Captain : विराट कोहलीपासून रोहित शर्मापर्यंत एका वर्षात भारताचे सहा कर्णधार


नवी दिल्ली – भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) बुधवारी (15 जून) आयर्लंडविरुद्ध टीम इंडियाची निवड केली. दोन टी-20 मालिकेसाठी हार्दिक पांड्याकडे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. टी-20 मध्ये तो भारताचा नववा कर्णधार असेल. त्याच्या आधी वीरेंद्र सेहवाग, एमएस धोनी, सुरेश रैना, अजिंक्य रहाणे, विराट कोहली, रोहित शर्मा, शिखर धवन आणि ऋषभ पंत यांनी T-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले आहे.

गेल्या एक वर्षापासून (जून 2021), भारताचे वेगवेगळ्या फॉरमॅटमध्ये सहा खेळाडूंनी नेतृत्व केले आहे. त्यात रोहित शर्मा, विराट कोहली, शिखर धवन, केएल राहुल, अजिंक्य रहाणे आणि ऋषभ पंत यांचा समावेश आहे. आता आणखी एका प्रयोगात हार्दिक पांड्याला कर्णधार बनवण्यात आले आहे.

जून 2021 पासून कसोटी सामन्यांमध्ये भारताचे कर्णधार:

  • विराट कोहली : गेल्या एका वर्षात कोहलीने आठ कसोटी सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवले आहे. यादरम्यान टीम इंडियाचा तीन सामन्यांत पराभव झाला. चार सामन्यांत विजय मिळवला. त्याचवेळी एक सामना अनिर्णित राहिला.
  • अजिंक्य रहाणे : गेल्या वर्षी न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात अजिंक्य रहाणेला कर्णधारपदाची संधी मिळाली. त्यातील कानपूर येथील कसोटी सामना अनिर्णीत राहिला.
  • केएल राहुल: दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर विराट कोहलीच्या दुखापतीमुळे केएल राहुलला एका सामन्यात कर्णधारपद सांभाळावे लागले. त्यात संघाचा पराभव झाला.
  • रोहित शर्मा: विराट कोहलीने दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतर कसोटी कर्णधारपद सोडले. रोहित शर्माला नियमित कर्णधार बनवण्यात आले. त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत श्रीलंकेचा 2-0 असा पराभव केला.

जून 2021 पासून एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचे कर्णधार:

  • शिखर धवन : इंग्लंड दौऱ्यावर मुख्य संघ रवाना झाल्यामुळे श्रीलंका दौऱ्यासाठी शिखर धवनला कर्णधार करण्यात आले होते. तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत भारताने 2-1 ने विजय मिळवला होता. अशा प्रकारे धवनने दोन सामने जिंकले आणि एक सामना गमावला.
  • केएल राहुल: नियमित कर्णधार रोहित शर्माच्या दुखापतीमुळे केएल राहुलला दक्षिण आफ्रिकेतील तीन सामन्यांच्या मालिकेचे नेतृत्व करावे लागले. तिन्ही सामन्यांमध्ये टीम इंडियाचा पराभव झाला.
  • रोहित शर्मा: पूर्णवेळ कर्णधार म्हणून रोहित शर्माने वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेत प्रथमच कर्णधारपद भूषवले. तिन्ही सामने जिंकण्यात टीम इंडियाला यश आले.

जून 2021 पासून टी-20 सामन्यांमध्ये भारताचे कर्णधार:

  • शिखर धवन: श्रीलंकेत झालेल्या तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाचा 1-2 ने पराभव झाला. धवनने एका सामन्यात विजय मिळवला होता. त्याचवेळी दोन सामने हरले.
  • विराट कोहली: T-20 विश्वचषकात भारतीय संघाने विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली पाच सामने खेळले. तीन जिंकले आणि दोन हरले. यामध्ये पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवांचा समावेश आहे.
  • रोहित शर्मा : विराट कोहलीनंतर रोहित शर्माला कर्णधार बनवण्यात आले. यादरम्यान भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंड, वेस्ट इंडिज आणि श्रीलंकेचा पराभव केला. अशा प्रकारे रोहितने नऊ सामने जिंकले.
  • ऋषभ पंत: रोहित शर्मा आणि केएल राहुल यांच्या अनुपस्थितीत दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत ऋषभ पंतने कर्णधारपदाची धुरा सांभाळली. संघाने तीनपैकी दोन सामने गमावले आहेत. एका सामन्यात यश मिळाले.