Prophet Remarks Row : विहिंप आणि बजरंग दलाला कर्नाटकात नाही रॅलीची परवानगी, करायचा होता पैगंबर प्रकरणी झालेल्या हिंसाचाराचा निषेध


मंगळुरू – कर्नाटकातील मंगळुरूमध्ये विहिंप आणि बजरंग दलाला रॅली काढण्यास पोलिसांनी परवानगी नाकारली. या उजव्या विचारसरणीच्या संघटनांनी मोहम्मद पैगंबर यांच्या विरोधात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून देशातील विविध भागात झालेल्या हिंसाचाराचा निषेध करायचा होता.

या दोन्ही संघटनांना गुरुवारी मंगळुरूमध्ये रॅली काढायची होती. भाजप नेत्यांनी पैगंबरांबद्दल केलेल्या काही वक्तव्याविरोधात हिंसाचार करणाऱ्यांविरोधात त्यांना आपला निषेध नोंदवायचा होता. ही रॅली मंगळुरूच्या पीव्हीएस सर्कलजवळ होणार होती. विहिंप आणि बजरंग दलाच्या नेत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून हा निर्णय जाहीर केला.

मंगळुरूचे पोलिस आयुक्त एन शशी कुमार म्हणाले की, शहरात अशा रॅलीला परवानगी नाही. पोलीस सूत्रांच्या म्हणण्यानुसार, त्यांना निषेध रॅली काढण्यासाठी परवानगी मागणारे कोणतेही पत्र मिळाले नव्हते आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी त्यांना परवानगी नाकारण्यात आली होती.

विहिंपचे नेते शरण पाम्पवेल यांनी सांगितले की त्यांनी निषेध करण्यासाठी परवानगी मागितली होती. पोलिसांनी परवानगी नाकारली असल्याने, संघटना आता जिल्हा उपायुक्तांमार्फत राष्ट्रपतींना राष्ट्रव्यापी हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी निवेदन पाठवणार आहे.