LPG Gas Connection : आता नवीन गॅस कनेक्शनसाठी ग्राहकांना मोजावे लागतील जास्त पैसे, आजपासून भरावे लागणार वाढलेले दर


नवी दिल्ली – तेल विपणन कंपन्यांनी नवीन घरगुती एलपीजी कनेक्शनच्या सिक्युरिटी डिपॉझिटमध्ये 750 रुपयांची वाढ केली आहे. ग्राहकांना आता प्रत्येक कनेक्शनसाठी 1,450 रुपयांऐवजी 2200 रुपये मोजावे लागणार आहेत. 16 जून म्हणजेच आजपासून त्याची अंमलबजावणी होणार आहे.

रेग्युलेटरही महाग झाले
यासोबत नवीन कनेक्शन घेताना प्रत्येकी 14.2 किलोच्या दोन सिलिंडरवर 4,400 रुपये डिपॉझिट भरावे लागणार आहेत. गॅस रेग्युलेटरची किंमतही 150 रुपयांवरून 250 रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे.

पाच किलोच्या सिलेंडरची वाढली सुरक्षा रक्कमही
त्याचबरोबर 5 किलोच्या सिलेंडरची सुरक्षा रक्कमही वाढवण्यात आली आहे. इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम यांनी जारी केलेल्या प्रसिद्धीमध्ये असे सांगण्यात आले आहे की, पाच किलोच्या सिलिंडरची सुरक्षा रक्कम आता आठशेऐवजी 1,150 रुपये करण्यात आली आहे. त्याच्या पाईप आणि पासबुकसाठी 150 आणि 25 रुपये द्यावे लागतील.

उज्ज्वला योजनेचा जनतेला धक्का
प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचे ग्राहकही नवीन दरांमुळे हैराण झाले आहेत. या ग्राहकांनी त्यांच्या कनेक्शनवर सिलिंडर दुप्पट केल्यास दुसऱ्या सिलिंडरसाठी वाढीव सुरक्षा रक्कम भरावी लागेल. मात्र, उज्ज्वला योजनेंतर्गत एखाद्याने नवीन कनेक्शन घेतल्यास, सिलिंडरची सुरक्षा रक्कम पूर्वीप्रमाणेच द्यावी लागेल.

जर तुम्ही आता एका सिलिंडरसह नवीन गॅस कनेक्शन घेण्यासाठी गेलात, तर तुम्हाला यासाठी 3690 रुपये मोजावे लागतील. स्टोव्ह घ्यायचा असेल तर त्यासाठी वेगळे पैसे द्यावे लागतील. एलपीजीच्या वाढत्या किमतींमध्ये कनेक्शनच्या किमतीमुळे लोक हैराण झाले आहेत.