३५०० वर्षांपासून मानवाला परिचित आहे चिकनचा स्वाद

चिकन बिर्याणी, चिकन कबाब, मोमोज अशी नुसती नावे ऐकली तरी मांसाहारी लोकांच्या पोटात कावळे ओरडायला लागतात. विशेष म्हणजे जगभर चिकन प्रेमी खवय्ये आहेत. पण प्रश्न असा पडतो कि माणसाने कोंबड्या पाळणे आणि कोंबड्या खाणे यांची सुरवात कधी केली असावी? अर्थात खाण्यापूर्वी कोंबडी पालनाची सुरवात झाली असावी असे म्हटले जाते. पण हे नक्की की माणसाला पूर्वी चिकनचा स्वाद माहिती नव्हता तरी चिकन इतके लोकप्रिय झाले की आज चिकनच्या विविध पदार्थांना पोटात जागा देणाऱ्या खवय्यांची संख्या मोजणे केवळ अशक्य आहे.

युरोप मधील संशोधक या विषयात जगभरातील देशात संशोधन करत आहेत. एक प्रवाद असा आहे कि १० हजार वर्षांपूर्वी आशियातील म्हणजे चीन, दक्षिण पूर्व आशिया, भारतात चिकन खाल्ले जात होते. युरोप मध्ये सात हजार वर्षांपासून चिकन खाल्ले जाते. असे म्हणतात कि घरातून सर्वाधिक पाळला जाणारा कोंबडी हा एकमेव जीव आहे जो अंड्यांसाठी आणि खाण्यासाठी घरात पाळला जातो.

संशोधकांना १५०० इसवी पूर्व म्हणजे ३५२२ वर्षांपूर्वी सर्वप्रथम लाओस, कंबोडिया, व्हिएतनाम, म्यानमार आणि थायलंड या ठिकाणी कोंबड्यांचे सर्वात जुने अवशेष सापडले. या संशोधकांनी ८९ देशातील ६०० पुरातत्व जागी तपासणी केली तेव्हा मध्य थायलंडच्या वट बोन्नोन येथे कोंबडीची सर्वात पुरातन हाडे मिळाली. माणूस आणि कोंबडी यांच्या संबंधास भात शेती कारणीभूत आहे असाही दावा केला जातो. आणि आजही चिकन सर्वाधिक भाताबरोबर खाल्ले जाते.

असे म्हणतात माणूस भातशेती करू लागला तेव्हा शेजारच्या जंगलातून रेड फौल प्राणी माणसाजवळ आले. हे कोंबडीच्या जातीचे पक्षी तांदूळ चोरीसाठी येत असत. पण हळूहळू ते माणसात रुळले आणि माणसांसोबत राहू लागले. रेड फौलच्या अनेक जातींपैकी दोन जाती पाळीव बनल्या असे म्हणतात.