परंपरेनुसार आजारी पडले जगन्नाथ- १४ दिवस एकांतवासात
ओरिसाच्या जगन्नाथ पुरी मध्ये जेष्ठ महिन्यात पौर्णिमेला भगवान जगन्नाथ परंपरेनुसार आजारी पडले असून आता यापुढे १४ दिवस ते एकांतवासात जाणार आहेत. बुधवारी १०८ कलश स्थान झाल्यावर मंदिर परंपरेनुसार भगवान बलभद्र, भगवान जगन्नाथ आणि माता सुभद्रा आजारी पडले. या काळात दैतापती सेवक फक्त देवांना भेटू शकतील. एकांतवासात भगवानांचा मुक्काम जेथे असतो त्याला अनासार घर म्हटले जाते.
या काळात भगवानांवर विविध प्रकारच्या वनऔषधी, तेल मालिश, फुले अर्क यांचे उपचार होतात आणि या काळात देवाला फक्त फळांचा नैवेद्य दाखविला जातो. माणूस आजारी पडल्यावर जसे उपचार केले जातात तसेच भगवान जगन्नाथ यांच्यावर उपचार होतात. या काळात दैतापती गुप्त अनुष्ठाने करतात आणि रथयात्रेच्या दिवशी भगवान पुन्हा ताजेतवाने होऊन येतात असे मानले जाते.
उपचार करताना भगवंतावर प्रथम ताप उतरावा यासाठी उपचार होतात मग हर्बल तेलाचे मालिश केले जाते आणि फक्त फळांचा आहार दिला जातो. रथयात्रेच्या एक दिवस अगोदर ‘ नबा जौबना’ म्हणजे नवे दर्शन देण्यासाठी भगवंत भक्तांसमोर येतात अशी ही प्रथा आहे.