कुवेतकडून भारतातील गायींच्या शेणाला मागणी
कुवेत ने काही दिवसांपूर्वी भारतातून गहू मागविला होता आणि आता या देशाकडून भारतातून गाईचे शेण मोठ्या प्रमाणावर मागविले गेले आहे. सुमारे १९२ मेट्रिक टनाची पहिली खेप राजस्थान आणि उत्तर प्रदेशातून कुवेत कडे समुद्र मार्गे रवाना केली गेल्याचे समजते. मोहम्मद पैगंबर यांच्या संदर्भात वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या विरोधात मुस्लीम देशांनी, त्यातही विशेषतः खाडी देशांनी तीव्र स्वरूपाच्या प्रतिक्रिया दिल्यानंतर खाडी देशांबरोबर भारताचे संबंध बिघडणार अशी जोरदार चर्चा सुरु झाली होती. काही खाडी देशांनी भारतीय राजदूतांची मायदेशी रवानगी केली होती आणि भारतात सुद्धा याच कारणाने विरोधी पक्षांनी निदर्शने केली होती. पण याच पार्श्वभूमीवर खाडी देश कुवेतने भारताकडून मोठ्या प्रमाणावर गाईचे शेण मागविल्याने या चर्चेतील जोर संपला असल्याचे दिसून आले आहे.
कृषी आणि किसान कल्याण मंत्री राधामोहन सिंह यांनी गाईच्या शेणाची ही सर्वात मोठी निर्यात ऑर्डर असल्याचे सांगितले. ते म्हणाले भारतात गाई विपुल आहेत आणि त्यामुळे शेण मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होते. कुवेत कडून मागणी आल्याने आता गाईच्या शेणाची निर्यात करण्याच्या शक्यता वाढल्या आहेत. परिणामी उत्तर प्रदेश आणि राजस्थान प्रमाणेच अन्य राज्यातून सुद्धा शेण निर्यात केले जाईल.
खाडी देशात खजुराचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. कुवेत मधील काही संशोधकांनी भारतातील गाईच्या शेणाचा खत म्हणून वापर केल्याने खजुराच्या उत्पादनात वाढ झाल्याचे म्हटले आहे. परिणामी भारतातून गाईचे शेण आयात करण्याचा निर्णय कुवेत सरकारने घेतला आहे. निर्यात होणारा हा पहिला टप्पा जयपूरच्या श्री पांजरपोळ गोशाळेतील सनराईज ओर्गेनिक पार्क मध्ये कस्टमच्या निगराणीखाली पॅकिंग केला गेला आणि जहाजातून रवाना झाला असे समजते. अनेक देशात गाईचे शेण खत किंवा इंधन म्हणून वापरले जाते.