नुपूर शर्मा यांच्या समर्थकांविरोधात निदर्शने केल्याप्रकरणी २०० हून अधिक जणांवर गुन्हा दाखल


मुंबई: महाराष्ट्रातील भिवंडी पोलिसांनी भाजपच्या माजी नेत्या नुपूर शर्मा यांच्या समर्थकांच्या विरोधात बेकायदेशीरपणे एकत्र जमल्याच्या आरोपाखाली 200 हून अधिक लोकांविरुद्ध दोन गुन्हे दाखल केले आहेत. याबाबत पोलिसांनी माहिती दिली. नुपूर यांना नुकतेच प्रेषित मोहम्मद यांच्या विरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी भाजपने पक्षातून निलंबित केले होते. महाराष्ट्रातील भिवंडी शहरात 12 जून रोजी अनेक लोक एका ठिकाणी जमले होते, त्यामुळे परिस्थिती तणावपूर्ण झाली होती.

पोलिसांनी सांगितले की, त्यापैकी काहींनी मुकेश बाबुराम चव्हाण आणि साद अन्सारी यांच्या घराकडे मोर्चा वळवला आणि सोशल मीडियावर नुपूर शर्माच्या समर्थनार्थ त्यांच्या पोस्टचा निषेध केला. काही आंदोलकांनी अन्सारी यांच्यावरही हल्ला केल्याचा आरोप आहे. भिवंडीच्या भोईवाडा पोलिस ठाण्यात 150 आणि नारपोली पोलिस ठाण्यात 65 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. भारतीय दंड संहितेच्या कलम 141, 143, 322, 323, 504 आणि 506 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.