हमखास पराभव, म्हणून पवारांना लढवायची नाही राष्ट्रपती निवडणूक- सीताराम येचुरी
१८ जुलै रोजी होणाऱ्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारी साठी सर्व विरोधी राजकीय पक्षांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार याच्या नावावर शिक्कामोर्तब केले पण पवारांनी या निवडणुकीत उतरण्यास स्पष्ट नकार दिल्याने आता विरोधी पक्षांनी अन्य उमेदवाराचा शोध सुरु केला आहे. पवार यांच्या नकारामागे काय कारण असावे याची चर्चा होत असताना भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे महासचिव सीताराम येचुरी यांनी वेगळाच खुलासा केला आहे.
येचुरी यांच्या म्हणण्यानुसार मंगळवारी त्यांच्यासह भाकपाचे महासचिव डी. राजा, राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल, पीसी चाको यांनी पवार यांची दिल्लीत स्वतंत्र भेट घेतली. तेव्हा पवार यांनी राष्ट्रपती निवडणुकीत उतरण्यास नकार दिला. याचे कारण म्हणजे राजकारणात ६० वर्षे घालविल्यावर ज्या निवडणुकीत पराभव होणार हे स्पष्ट दिसते आहे ती निवडणूक लढविण्याची पवार यांची इच्छा नाही. त्यांच्या राजकीय जीवनाच्या या टप्प्यावर पवार हार पत्करण्यास तयार नाहीत. यामुळे अन्य चेहर्याचा शोध घेणे भाग पडले आहे.
दरम्यान प.बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूलच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी ज्या प्रकारे फर्मान काढून १५ जून रोजी दिल्ली मध्ये संयुक्त उमेदवार विचारासाठी सर्व विरोधी दल पक्षीय बैठक बोलावली आहे, त्यावरून मतभेद सुरु झाले आहेत. सीताराम येचुरी यांनी ज्या पद्धतीने बैठकीचा आदेश काढला गेला त्यावर नाराजी व्यक्त करून बैठकीला त्यांचे खासदार जातील पण ते किंवा डी राजा जाणार नाहीत असे स्पष्ट केले आहे.
म. गांधी यांचे नातू व प. बंगालचे माजी राज्यपाल गोपालकृष्ण गांधी यांच्याशी संपर्क करून त्यांना राष्ट्रपती पद निवडणुकीसाठी विरोधी दलाने पाठींबा दिला आहे मात्र त्यांनी अजून होकार कळविलेला नाही. २०१७ मध्ये गोपाळकृष्ण गांधी यांनी वैंकय्या नायडू यांच्या विरोधात उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढविली होती पण त्यांना पराभव पत्करावा लागला होता.