महिनाभर झुरळे पाळा, दीड लाख रुपये मिळवा
घरात झुरळ दिसले कि महिलावर्गाच्या तोंडातून किंकाळी बाहेर पडलीच म्हणून समजावे. हे झुरळ घराबाहेर काढण्यासाठी विविध उपाय ताबडतोब योजले जातात. पण जर कुणी घरात महिनाभर झुरळे पाळण्याबद्दल दीड लाख देऊ करत असेल तर? युएसएच्या उत्तर कॅरोलिना भागातील एका पेस्ट मॅनेजमेंट कंपनीने या प्रकारची ऑफर देऊ केली आहे. ही कंपनी झुरळे नष्ट करण्याच्या औषधावर संशोधन करत आहे.
कंपनीच्या वेबसाईटवर या संदर्भात जे घरमालक त्यांच्या घरात झुरळे ठेवण्यास सहमती देतील यांना त्या बदली २००० डॉलर्स दिले जाणार आहेत. कंपनीच्या औषधाचा झुरळांवर किती आणि कसा परिणाम होतो याची निरीक्षणे या काळात केली जाणार आहेत. यासाठी तयारी दाखविणांऱ्यांच्या घरात कंपनी १०० झुरळे सोडणार आहे आणि ३० दिवस हा प्रयोग सुरु राहणार आहे. यासाठी कंपनीला ५-७ घरमालकांची गरज आहे. कंपनी पारंपारिक पेस्ट कंट्रोलचा वापर झुरळे नष्ट करण्यासाठी करणार आहे.
या साठी कंपनीच्या काही अटी आहेत. त्यानुसार कंपनीचे टेस्टिंग सुरु असेल तेव्हा अन्य पेस्ट कंट्रोलचा वापर मालक करू शकणार नाहीत. दुसरे म्हणजे मालकाची या प्रयोगासाठी लेखी परवानगी लागेल. मालक किमान २१ वर्षाचा हवा आणि त्याचे अमेरिकेत घर हवे. समजा ३० दिवसात झुरळे पूर्ण नष्ट झाली नाहीत तर कंपनी अन्य उपायांनी झुरळे पूर्ण नष्ट करून देणार आहे असेही समजते.