चीन व्हिसा नियम शिथिल, भारतीय विद्यार्थ्यांना दिलासा
भारतातील चीनी दुतावासाने कोविड १९ नीतीनुसार गेली दोन वर्षे चीन व्हिसा बाबत घातलेले निर्बंध शिथिल केले असून या नियमात सुधारणा केल्या गेल्या आहेत. बीजिंग मध्ये व्हिसा बंदी नियम सक्त केल्याने दोन वर्षापेक्षा अधिक काळ अनेक विद्यार्थी, व्यापारी, व्यावसायिक, उद्योजक भारतात अडकून पडले होते असे समजते. चीनी विश्वविद्यालयात शिकणाऱ्या हजारो भारतीय विद्यार्थ्यांना व्हिसा नियम नव्याने बदलले गेल्याने दिलासा मिळाला असून आता हे विद्यार्थी चीनमध्ये जाऊन त्यांचे शिक्षण पुरे करू शकणार आहेत. यात मेडिकल विद्यार्थी संख्या अधिक असल्याचे समजते.
चीन तर्फे सोमवारी सर्व क्षेत्रातील काम पुन्हा सुरु करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले असून विविध कामांसाठी चीन ला परतू इच्छिणारे विदेशी नागरिक, त्यांचे परिवार यांना चीनचा व्हिसा देण्याच्या कामाला सुरवात होत आहे. चीन मध्ये उद्योग व्यवसायात असलेले हजारो व्यावसायिक करोना पूर्वी भारत भेटीवर आले पण २०१९ डिसेंबर मध्ये चीन मध्ये करोना उद्भवल्याने व्हिसा न मिळाल्याने येथेच अडकून पडले होते. आता ज्यांच्याकडे चीनचा पर्मनंट रेसिडेंट प्रमाणपत्र आहे त्यांना सर्वाना पुन्हा व्हिसा दिला जाणार आहे. विभिन्न कंपन्यातून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुद्धा व्हिसा मिळणार आहे. कामानिमित्त भारतात आलेले अनेक चीनी कर्मचारी सुद्धा बीजिंग व्हिसा बंदी मुळे भारतात अडकून पडले असल्याचे समजते.
अर्थात व्हिसा नियम शिथिल केले गेले असले तरी अद्याप पर्यटन किंवा खासगी कामासाठी चीनला भेट देऊ इच्छिणाऱ्यासाठी व्हिसा नियम शिथिल झालेले नाहीत. एका रिपोर्ट नुसार करोना पूर्वी चीन मधून भारतात परतलेले २३ हजार विद्यार्थी येथेच अडकून पडले होते. त्यातील १२ हजार विद्यार्थ्यांनी चीन मध्ये परतून अभ्यासक्रम पूर्ण करण्याची इच्छा दाखविली आहे. अजून थेट चीन साठी विमानसेवा सुरु नाही त्यामुळे अन्य देशांच्या मार्गेच त्यांना चीन मध्ये जावे लागणार आहे.