कॅनडा मध्ये प्रत्येक सिगारेटवर छापला जाणार धोक्याचा इशारा
कॅनडा तंबाखू उत्पादनाबाबत जगासमोर एक आदर्श ठेवत आहे. नशामुक्तीचे आणखी एक पाउल म्हणून कॅनडाने आता प्रत्येक सिगारेटवर आरोग्याला धोकादायक असा इशारा छापण्याचा निर्णय घेतला असून असा निर्णय घेणारा कॅनडा हा जगातील पहिला देश आहे. २० वर्षांपूर्वी तंबाखू उत्पादनांच्या पँकिंगवर आरोग्यास धोकादायक असा इशारा छापण्याची सुरवात कॅनडा मध्येच झाली होती आणि जगातील अन्य देशांनी नंतर त्यांचे अनुकरण केले होते असे समजते.
या संदर्भात कॅनडाचे आरोग्य मंत्री कॅरोलीन बेनेट म्हणाल्या तंबाखूच्या पॅकेटवर हा इशारा दिला गेला आहे पण नागरिकांचे त्याकडे पुरेसे लक्ष नाही असे दिसून आले आहे. या इशाऱ्याचा प्रभाव आता ओसरला आहे. त्यामुळे सरकारने व्यक्तिगत उत्पादनांवर हा इशारा छापण्याचा निर्णय घेतला आहे. कॅनडा मध्ये तंबाखूजन्य पदार्थ,त्यातही सिगारेटचे सेवन करण्याचे प्रमाण तरुण पिढीत जास्त आहे आणि ते वाढत चालले आहे. त्यामुळे आता प्रत्येक सिगारेटवर धोक्याचा इशारा छापला जाईल आणि त्याची सुरवात पुढच्या वर्षापासून केली जाईल. गेल्या महिन्यातील आकडेवारी सांगते कि कॅनडा मध्ये १० टक्के नागरिक नियमित धुम्रपान करतात. २०३५ पर्यंत ही संख्या निम्म्यावर यावी यासाठी सरकार प्रयत्न करत आहे.