आनंद महिंद्र रिझर्व्ह बँकेच्या मानद संचालकपदी नियुक्त
केंद्र सरकारने महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्र यांची रिझर्व बँकेच्या मानद संचालक बोर्ड पदावर नियुक्ती केली आहे. याचबरोबर पंकज आर पटेल, वेणू श्रीनिवासन यांचीही याच पदावर नियुक्ती केली आहे. आयआयएम अहमदाबादचे माजी प्रोफेसर रवींद्र ढोलकिया यांचाही समावेश यात केला गेला असून ही नियुक्ती चार वर्षांसाठी आहे. रिझर्व बँकेने या संदर्भात एक अधिसूचना मंगळवारी जारी केली आहे. मानद संचालकांना महत्वाचे निर्णय घेण्याचे अधिकार नसतात असे समजते.
या नुसार मंत्रिमंडळाकडून नियुक्त केल्या गेलेल्या समितीच्या शिफारसीनुसार अश्या मानद संचालक नियुक्त्या होत असतात. रिझर्व बँकेच्या गव्हर्नरांच्या अध्यक्षतेखाली बोर्ड सदस्यांची, आरबीआय अधिकारानुसार भारत सरकारतर्फे नियुक्ती होत असते. आनंद महिंद्रा महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आहेत आणि टेक महिंद्र आणि महिंद्र अँड महिंद्रचे मानद कार्यकारी अध्यक्ष आहेत. वेणू श्रीनिवासन टीव्हीएस मोटर्सचे अध्यक्ष आहेत तर पंकज आर पटेल झायडस लाईफ सायन्सचे अध्यक्ष आहेत.