खुशखबर : दीड वर्षात उपलब्ध होतील 10 लाख नोकऱ्या, मोदींनी दिल्या सर्व विभाग आणि मंत्रालयांना भरतीच्या सूचना


नवी दिल्ली – सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. येत्या दीड वर्षात सरकार विविध विभागांमध्ये दहा लाख पदांची भरती करणार आहे. केंद्र सरकारच्या विविध विभाग आणि मंत्रालयांतर्गत ही भरती होणार आहे. सरकारच्या या पाऊलामुळे देशातील करोडो तरुणांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व विभाग आणि मंत्रालयांमधील कर्मचाऱ्यांच्या स्थितीचा आढावा घेतल्यानंतर या नोकऱ्या देण्याचे आदेश दिले आहेत.

पीएमओने केले ट्विट
सरकारच्या या निर्णयावर पंतप्रधान कार्यालयाकडून एक ट्विट करण्यात आले आहे. पीएमओने केलेल्या ट्विटमध्ये असे सांगण्यात आले आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व विभाग आणि मंत्रालयांमधील मानव संसाधन परिस्थितीचा आढावा घेतला आणि सरकारने पुढील 1.5 वर्षांत मिशन मोडमध्ये 10 लाख लोकांची भरती करावी, असे निर्देश दिले आहेत.

एप्रिलमध्ये घेतली अधिकाऱ्यांची भेट
मीडिया रिपोर्ट्सनुसार, पीएम मोदींनी यापूर्वी एप्रिलमध्येही सरकारच्या उच्च अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. शासनाच्या विविध विभागातील रिक्त पदे भरण्याच्या प्रक्रियेला प्राधान्य देण्यास त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. जेणेकरून देशातील तरुणांना संधी निर्माण करता येतील.

विरोधक करत होते टीका
अनेक दिवसांपासून मोदी सरकारवर विरोधकांकडून बेरोजगारीच्या मुद्द्यावरून टीका होत आहे. दरम्यान, एवढ्या मोठ्या प्रमाणात भरतीला सरकारने हिरवा झेंडा दाखवला आहे. पुढील 1.5 वर्षांसाठी म्हणजे डिसेंबर 2023 पर्यंत केंद्र सरकारच्या विविध विभाग आणि मंत्रालयांद्वारे या भरती केल्या जातील.