१५ जूनला इंटरनेट एक्सप्लोररला दिला जाणार निरोप

मायक्रोसॉफ्टने १५ जून पासून इंटरनेट एक्सप्लोरर हा त्यांचा ब्राउझर कायमचा बंद केला जात असल्याचे जाहीर केले आहे. गेली २७ वर्षे या ब्राउझरने अनेक देश आणि दुनियेला जोडून ठेवले होते. विंडोज १० वर आता इंटरनेट एक्सप्लोरर मायक्रोसॉफ्ट एज मध्ये मिळेल असे समजते. मायक्रोसॉफ्ट एज इंटरनेट एक्स्प्लोररच्या तुलनेत अधिक वेगवान, सुरक्षित व आधुनिक असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. या एज मध्येच इंटरनेट एक्स्प्लोरर मोड दिला असून त्यामुळे त्यावर आधारित वेबसाईट व अॅप अॅक्सेस करता येणार आहेत.

सुरवातीला जेव्हा इंटरनेट एक्सप्लोरर आला तेव्हा तो खरेदी करावा लागे पण नंतर हा ब्राउझर मायक्रोसॉफ्ट पॅकेज बरोबर मोफत दिला जाऊ लागला. त्यासाठी हे व्हर्जन फ्री डाऊनलोड करता येत असे. १९९५ साली प्रथम विंडोज ९५ साठी अॅड ऑन पॅकेज स्वरुपात तो सादर झाला होता. २००३ मध्ये ९५ टक्के युजर्स या ब्राउझरचा वापर करत होते. पण नंतर अन्य स्पर्धक नवे ब्राउझर घेऊन आल्यावर याचा युजर बेस कमी होत गेला. २०१६ मध्ये मायक्रोसॉफ्ट ने नवीन ब्राउझर मायक्रोसॉफ्ट एज आणल्यावर इंटरनेट एक्स्प्लोररचे नवीन फिचर डेव्हलपमेंट बंद झाले होते असे सांगितले जात आहे.