राष्टपती निवडणूक, पुन्हा शरद पवार यांचे नाव चर्चेत

देशात राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची अधिसूचना जारी झाली आहे. देशातील सर्वच राजकीय पक्ष उमेदवार कोण असावा याबाबत विचार करत असतानाच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संस्थापक आणि जेष्ठ नेते शरद पवार यांचे नाव ठळकपणे समोर आले आहे. विशेष म्हणजे कॉंग्रेसच्या सर्वेसर्वा सोनिया गांधी यांनी शरद पवार यांचे नाव सुचविले असल्याचे सांगितले जात आहे. कॉंग्रेसने पवार यांना समर्थन देऊ केले आहे तसेच आम आदमी पक्षांचे आमदार संजय सिंह यांनीही राष्ट्रपती पदासाठी शरद पवार योग्य उमेदवार असल्याचे विधान केले आहे.

मिडिया रिपोर्ट नुसार कॉंग्रेस, टीएमसी, आम आदमी पक्ष, डीएमके यांच्या नंतर शिवसेना सुद्धा शरद पवार यांच्या उमेदवारी साठी राजी झाली आहे. गुरुवारी कॉंग्रेसचे मल्लिकार्जुन खर्गे यांनी पवार यांची भेट घेतली तर रविवारी संजय सिंह यांनी पवार यांच्यासोबर फोनवरून बोलणी केली.

खुद्द शरद पवार यांनी मात्र आपण राष्ट्रपती पदाच्या शर्यतीत नाही असे सोमवारी झालेल्या राष्ट्रवादीच्या बैठकीत सांगितल्याचे वृत्त काही प्रसार माध्यमांनी दिले आहे. विशेष म्हणजे जेव्हा जेव्हा राष्ट्रपती निवडणूक जाहीर झाली तेव्हा अलीकडच्या काळात अनेकदा शरद पवार यांचे नाव चर्चेत राहिले आहे आणि वेळोवेळी शरद पवार यांनी त्यासाठी नकार दिला आहे. तरीही पुन्हा पवार यांचेच नाव चर्चेत येणे याला विशेष महत्व दिले जात आहे.

दरम्यान बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी १५ जून रोजी सर्व दलीय बैठक बोलावली आहे. भाजप राष्ट्रपती पदाची निवडणूक शक्यतो बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्नशील होते पण आता भाजप उमेदवार निवडीसाठी सक्रिय झाल्याचे सांगितले जात आहे.