तिजोरी फुल्ल, बीसीसीआयचा बटवा सैल, खेळाडू, अम्पायरची पेन्शन वाढली
आयपीएल मिडिया हक्क लिलावातून ४६ हजार कोटींची कमाई झाल्याने बीसीसीआयची तिजोरी भरली असली तरी त्वरित बीसीसीआयने आपला बटवा सैल केला आहे. माजी क्रिकेट खेळाडू आणि माजी अम्पायरच्या निवृत्तीवेतनात बीसीसीआयने वाढ केल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार प्रथम श्रेणी माजी खेळाडूना पूर्वी मासिक १५ हजार पेन्शन होती ती आता ३० हजारावर नेण्यात आली आहे. माजी कसोटी खेळाडूना आता यापुढे ३७५०० ऐवजी ६० हजार रुपये व ज्यांना ५० हजार रुपये मिळत होते त्यांना यापुढे ७० हजार रूपये पेन्शन दिली जाणार आहे. आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेट खेळाडूना ३० हजार ऐवजी ५२५०० रूपये दिले जातील तर २००३ पूर्वी निवृत्ती घेतलेल्याना २२५०० ऐवजी ४५ हजार रुपये मिळणार आहेत.
बीसीसीआयचे अध्यक्ष आणि टीम इंडियाचा माजी कप्तान सौरव गांगुली या संदर्भात म्हणाला, पेन्शन वाढविणे गरजेचे होते. माजी खेळाडूंच्या आर्थिक स्थितीकडे लक्ष देणे आमची जबाबदारी आहे कारण क्रिकेट बोर्ड साठी हे खेळाडू, अम्पायर जणू जीवनरेखा आहेत. त्यांच्या निवृत्तीनंतर त्यांची काळजी घेणे आमची जबाबदारी आहे. विशेषतः सामन्यात अम्पायर महत्वाची भूमिका बजावत असतात पण ते नेहमी गुमनाम राहतात. बीसीसीआयला त्यांच्या योगदानाची जाणीव आहे. पेन्शन वाढ ही त्यांचे आभार व्यक्त करण्याची एक पद्धत म्हणता येईल. बीसीसीआयचे सचिव जय शहा म्हणाले, सुमारे ९०० लोकांना या योजनेचा फायदा मिळणार असून त्यातील ७५ टक्के लोकांना १०० टक्के पेन्शन वाढ मिळणार आहे.