एकदा फुलचार्ज केल्यावर सात महिने चालणार ही कार

जगात गेल्या काही वर्षात इलेक्ट्रिक कार्सची मागणी वाढत असल्याचे चित्र असले तरी एकदा चार्ज केल्यावर कार देत असलेली रेंज ग्राहकांना समाधान देणारी नाही. या पार्श्वभूमीवर अशी एक कार बाजारात दाखल होत आहे, जी एका चार्ज मध्ये बॅटरी पुन्हा चार्ज न करता सात महिने चालू शकणार आहे. युरोपियन कंपनी लाईटईयर तर्फे ‘लाईटईयर झिरो’ ही कार नोव्हेबर २०२२ मध्ये बाजारात आणली जाणार आहे असे समजते.

लाईटईअर झिरो, तिचे डिझाईन आणि टेक्नोलॉजीमुळे अगोदरच ग्राहकांच्या आकर्षणाचा विषय बनली आहे. निर्मात्यांच्या म्हणण्यानुसार ज्या देशात सूर्यप्रकाश मुबलक आहे, तेथे ही कार एकदा चार्ज केली तर ७ महिने चालेल आणि त्यासाठी बॅटरी चार्ज करण्याची गरज नाही. नेदरलंड सारख्या देशात सुद्धा एकदा चार्ज केल्यावर लाईटइयर झिरो दोन महिने चालेल. या वर्षाखेरी या कारचे उत्पादन सुरु होत असल्याचे समजते.

या कारच्या ५४ चौरस फुट भागात डबल कव्हर्ड सोलर पॅनल बसविले गेले आहेत. त्यामुळे कार चालत असताना सुद्धा बॅटरी चार्ज होत राहते. फक्त सौर उर्जेवर ही कार ७० किमी चालते म्हणजे प्रतिवर्ष ११००० किमी धावू शकते. सोलर शिवाय इलेक्ट्रिक कार फुल चार्ज केल्यावर ६२५ किमी अंतर पार करू शकते. ही कार हायवेवर प्रतितास ११० किमीच्या वेगाने ५६० किमी अंतर कापते. एरोडायनामिक डिझाईन आणि हायली एफिशीइंट मोटर्स मुळे हे शक्य होते. लाईटईअर झिरो ही सध्याच्या काळातील कुशल इलेक्ट्रिक कार असल्याचा दावा केला जात आहे. उन्हात ही कार पार्क केली तर दिवसाला ३५ किमी चालू शकते.