नवीन पार्टीसह राष्ट्रीय राजकारणात उतरणार के चंद्रशेखर राव
तेलंगानाचे मुख्यमंत्री आणि तेलंगाना राष्ट्र समिती पक्षाचे प्रमुख के चंद्रशेखर राव राष्ट्रीय राजकारणात महत्वाची भूमिका निभावण्यासाठी सज्ज झाले आहेत. राव दीर्घकाळ देशात बिगरकॉंग्रेस तिसरी आघाडी बनविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मात्र काही दिवसांपूर्वी त्यांनी अचानक तिसऱ्या आघाडीची गरज नाही अशी घोषणा केली. आता ते स्वतःची राष्ट्रीय पार्टी काढण्याच्या तयारीत आहेत.
यासाठी त्यांनी जगभरात विखुरलेल्या तेलंगाना नागरिकांना या संदर्भातील प्रस्ताव पाठविला होता. स्वतंत्र पक्ष काढून राष्ट्रीय राजकारणात सक्रीय होण्याच्या के. चंद्रशेखर राव यांच्या प्रस्तावाचे या एनआरआय समुदायाकडून जोरदार स्वागत झाले आहे. विभिन्न देशात राहत असलेल्या तेलंगाना नागरिकांशी झूम मिटिंगच्या माध्यमातून या संदर्भात चर्चा केली गेली होती असे समजते. के. चंद्रशेखर राव यांनी ज्या वेगाने तेलंगानाचा विकास केला ते पाहता ते देशाचे नेतृत्व मिळाले तर देशात परिवर्तन घडवून आणू शकतील असा विश्वास यावेळी व्यक्त केला गेल्याचे समजते.
देशाला सद्यस्थितीत के.चंद्रशेखर राव यांचेच नेतृत्व गरजेचे आहे असे मत सुद्धा एनआरआय व्यक्त करत आहेत असे सांगून प्रक्षाचे नेते बी गणेश म्हणाले, तेलंगणातील सत्तारूढ तेलंगाना राष्ट्र समिती स्थापन होऊन २१ वर्षे होत आहेत. त्यानिमित्ताने १९ जून रोजी होत असलेल्या बैठकीत टीआरएसचे नाव बदलून बीआरएस केले जाईल आणि त्यासंदर्भातील घोषणा के. चंद्रशेखर राव करतील. बीआरएस राष्ट्रीय राजकारणात सक्रीय होणार आहे.