चीनी टेनसेंट ने फ्लिपकार्टमध्ये खरेदी केला २६.४ कोटीं डॉलर्सचा हिस्सा
चीनी टेक कंपनी टेनसेंटने बिन्नी बन्सल यांच्या फ्लिपकार्टमध्ये २६.४ कोटी डॉलर्स गुंतवून हिस्सेदारी मिळविली आहे. हा करार गतवर्षी जुलै मध्ये फ्लिपकार्टला मिळालेल्या ३.६ अब्ज डॉलर्स फंडिंग नंतर सिंगापूर येथे केला गेल्याचे सांगितले जात आहे. टेनसेंटच्या युरोपियन उपकंपनीबरोबर हा सौदा झाला आहे. फ्लिपकार्टचे मुख्यालय सिंगापूर येथे आहे आणि कंपनी फक्त भारतात व्यवसाय करते.
या नव्या करारामुळे बन्सल यांची फ्लिपकार्ट मधील भागीदारी १.८४ टक्के इतकी राहिली आहे तर टेनसेंटने ०.७२ टक्के हिस्सा खरेदी केला आहे. फ्लिपकार्टने ३.६ अब्ज फंडिंग गोळा केल्यावर कंपनीचे मुल्य वाढून ३७.६ अब्ज डॉलर्सवर गेले आहे. फ्लिपकार्ट कडून दिल्या गेलेल्या माहितीनुसार टेनसेंटच्या उपकंपनी बरोबर झालेला करार प्रेस नोट ३ च्या अधिकारात येत नाही. जर एखादी कंपनी भारताशी ज्या देशाच्या सीमा लागलेल्या आहेत अश्या कुठल्याही देशातून फंडिंग प्राप्त करेल तर त्याची तपासणी होईल असा प्रेस नोट ३ चा अर्थ आहे.
टेनसेंटची गुंतवणूक असलेल्या पबजी गेमवर भारतात बंदी आहे. फ्लिपकार्ट शिवाय अन्य अनेक भारतीय कंपन्यात टेनसेंटची गुंतवणूक आहे. त्यात ओला, बायजू अश्या बड्या ऑनलाईन कंपन्यांचा समावेश आहे. फ्लिपकार्टची सुरवात २००७ मध्ये झाली असून सध्या ही कंपनी ८० श्रेणी मधली ८ कोटी उत्पादने विकते.