PAK vs WI : पाकिस्तानच्या बाबर आझमने केले नियमांचे उल्लंघन, वेस्ट इंडिजच्या मिळाल्या पाच धावा, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण


मुलतान – पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझम सध्या चर्चेत आहे. बाबर सध्या प्रत्येक सामन्यात नवीन विक्रम करत आहे. अलीकडेच, त्याने विराट कोहलीचा विक्रम मोडला आणि सर्वात कमी डावात 1000 धावा करणारा कर्णधार बनला. आता बाबरचे नाव पुन्हा चर्चेत आले आहे. मात्र, यावेळी त्याने क्रिकेटच्या नियमांचे उल्लंघन केले असून त्याचा फायदा वेस्ट इंडिज संघाला झाला. वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसऱ्या सामन्यात बाबर ग्लोव्हज घालून क्षेत्ररक्षण करताना दिसला. त्यानंतर अंपायरने बाबरला ग्लोव्हज काढण्यास सांगितले आणि वेस्ट इंडिजला पेनल्टी म्हणून पाच धावा दिल्या.

पाच धावा फुकट मिळाल्या तरीही वेस्ट इंडिजचा संघ कोणताही चमत्कार करू शकला नाही आणि दुसरा सामना 120 धावांच्या मोठ्या फरकाने गमावला. मात्र, बाबरचा ग्लोव्हज घालून फिल्डिंग करतानाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्याला प्रचंड ट्रोल केले जात आहे. पाकिस्तानच्या खेळाडूंनी यापूर्वी अनेकदा क्रिकेटच्या नियमांचे उल्लंघन केले आहे आणि त्याचा फटकाही त्यांना सहन करावा लागला आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
बाबर आझम वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ग्लोव्हज घालून क्षेत्ररक्षण करताना दिसला, तर क्रिकेटच्या नियमानुसार विकेटकीपरशिवाय इतर कोणताही खेळाडू क्षेत्ररक्षण करताना ग्लोव्हज घालू शकत नाही. जर एखाद्या खेळाडूने असे केले तर फलंदाजी करणाऱ्या संघाला अतिरिक्त पाच धावा दिल्या जातात. या कारणास्तव, बाबरचे ग्लोव्हज परिधान केल्याबद्दल क्रिकेट 28.1 च्या कायद्यानुसार वेस्ट इंडिज संघाला पाच अतिरिक्त धावा देण्यात आल्या.

पाकिस्तानने एकदिवसीय मालिका जिंकली
तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिले दोन सामने जिंकून पाकिस्तानने ही एकदिवसीय मालिका जिंकली आहे. मालिकेतील तिसरा सामना रविवारी मुल्तान येथे होणार आहे. तत्पूर्वी, पाकिस्तानकडे 2-0 अशी अभेद्य आघाडी आहे. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत 275 धावा केल्या. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजचा संघ केवळ 155 धावा करू शकला आणि 120 धावांच्या मोठ्या फरकाने सामना गमावला. बाबरने 77 आणि इमाम-उल-हकने 72 धावा केल्या. मोहम्मद नवाजने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. त्याच्याशिवाय मोहम्मद वसीम ज्युनियरने तीन आणि शादाब खानने दोन गडी बाद केले. शाहीन आफ्रिदीला एक विकेट मिळाली.

वेस्ट इंडिजकडून मायर्सने 33 आणि ब्रूक्सने 42 धावा केल्या. कर्णधार पूरनने 25 धावा केल्या. गोलंदाजीत अकिल हुसेनने तीन, अँडर फिलिप आणि अल्झारी जोसेफने प्रत्येकी दोन गडी बाद केले.