धनंजय महाडिकच ठरले विजयी पैलवान

महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात आल्याने चुरशीच्या बनलेल्या या लढती मध्ये भाजपचे तिसरे उमेदवार धनंजय महाडिक यांनीच अखेर डाव जिंकला असून त्यांनी त्यांचे प्रतीस्पर्धी कोल्हापूरचेच शिवसेना उमेदवार संजय पवार यांना चीत केले. भाजपने तिसरी जागा जिंकून महाविकास आघाडीला धोबीपछाड घातल्याची चर्चा सोशल मिडियावर होत आहे. उर्वरित पाच जागांचे निकाल अपेक्षेनुसार आले असून भाजपने दोन, राष्ट्रवादी १, शिवसेना १ आणि कॉंग्रेस कडे १ जागा आल्या आहेत.

निकालावर प्रतिक्रिया देताना शिवसेना प्रवक्ते आणि राज्यसभेवर पुन्हा निवडून आलेले संजय राउत यांनी आमचे मत बाद करण्यासाठी दबाव टाकला गेला असा आरोप केला असून विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी निकालानंतर प्रतिक्रिया देताना केलेल्या ट्वीट मध्ये’ निवडणूक केवळ लढण्यासाठी नाही तर जिंकण्यासाठी लढविली होती, जय महाराष्ट्र’ अशी पोस्ट केली आहे. संजय राऊत यांनी आमच्या उमेदवाराला पहिल्या पसंतीची ३३ मते आहेत, मग विजय कोणाचा ते ठरवा असे वक्तव्य केले होते त्यावर आपले म्हणणे मांडताना फडणवीस यांनी आमच्या उमेदवाराला संजय राऊत यांच्या इतकीच म्हणजे ४१ मते मिळाली आहेत असे सांगितले.

महाडिक यांच्या विजयात अपक्ष महत्वाचे ठरले. अपक्षांची नऊ मते फुटली असे म्हटले जात आहे. भाजपने काही मतांवर आक्षेप घेऊन निवडणूक आयोगाकडे तक्रार केल्यामुळे मतमोजणी रात्री उशिरा झाली. त्यामुळे निकाल सुद्धा रात्री उशिरा जाहीर करण्यात आला.