हे असते चित्रपटापूर्वी दाखविल्या जाणाऱ्या प्रमाणपत्राचे महत्व
आपण सर्व आवडीने चित्रपट पाहतो. चित्रपट गृहात किंवा टीव्हीवर सुद्धा आपण अनेक चित्रपटांचा आस्वाद घेतो. कोणताही चित्रपट सुरु होण्यापूर्वी एक प्रमाणपत्र किंवा सर्टिफिकेट किमान १० सेकंदासाठी पडद्यावर दाखविले जाते पण आपण त्याकडे फारसे लक्ष कधीच देत नाही. हे प्रमाणपत्र सेन्सॉर बोर्डाकडून प्रत्येक चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी निर्मात्याला मिळविणे बंधनकारक आहे. यामुळेच निर्माते चित्रपट पूर्ण शूट झाला कि हे सर्टिफिकेट मिळविण्यासाठी जीवाचा आटापिटा करतात. हे प्रमाणपत्र मिळाले नसेल तर चित्रपट रिलीज करता येत नाही इतके हे महत्वाचे प्रमाणपत्र आहे.
या प्रमाणपत्रातून बरीच महत्वाची माहिती आपल्याला मिळू शकते. अनेकांना या प्रमाणपत्रावर चित्रपटाचा कालावधी आणि किती रीळाचा चित्रपट आहे याची माहिती असते. पण या शिवाय सर्वात महत्वाचे असते ते सेन्सोर बोर्डाने दिलेले रँकिंग. यात यु, ए, व्ही आणि एस किंवा ए/व्ही असे रँकिंग दिलेले दिसते. या सर्वाला काही अर्थ आहे. व्ही असे अक्षर प्रमाणपत्रावर असेल तर १२ वर्षे वयाचे प्रेक्षक त्यांच्या पालकांसह हा चित्रपट पाहू शकतात असा त्याचा अर्थ आहे. ए असे अक्षर असेल तर १८ वर्षाखालील प्रेक्षक हा चित्रपट पाहू शकत नाहीत. यु अक्षर असले तर कोणत्याही वयाचा प्रेक्षक चित्रपट पाहू शकतो आणि एस अक्षर असेल तर हा चित्रपट डॉक्टर्स, वैज्ञानिक असा खास समुदायासाठी आहे असा अर्थ होतो.
भारतीय सेन्ट्रल बोर्ड ऑफ फिल्म म्हणजे सेन्सॉर बोर्ड हे जगातील पॉवरफुल सेन्सॉर बोर्ड मानले जाते. येथे नियमावली अतिशय कडक आहे. याचे मुख्यालय मुंबई येथे आहे. सेन्सॉर बोर्डाकडून मिळणाऱ्या प्रमाणपत्रावर रेटिंग प्रमाणेच चित्रपटाचे नाव, भाषा, कोणत्या रंगातील चित्रपट, चित्रपटाचा प्रकार , चित्रपट कुठे रिलीज होऊ शकतो, सेन्सॉर ऑफिसचे ठिकाण, प्रमाणपत्र कधी दिले त्याची तारीख, निर्मात्याचे नाव, चित्रपट परीक्षकांची नावे, चित्रपट किती एमएम स्क्रीन साठी आहे याची नोंद असते.
या शिवाय अनेकदा या प्रमाणपत्रावर त्रिकोण दिसतो. याचा अर्थ चित्रपटातील काही दृश्ये कट केली गेली आहेत. जास्त कट असतील तर प्रमाणपत्र दोन भागात दिले जाते. साधारण पणे ए प्रमाणपत्र दोन भागात मिळते.