मुशर्रफ यांची प्रकृती गंभीर

पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती आणि सेनाप्रमुख जनरल मुशर्रफ यांची प्रकृती अतिशय गंभीर असल्याचे त्यांच्या परिवाराकडून ट्वीट केले गेले आहे. मुशर्रफ व्हेन्टीलेटरवर नाहीत पण ते हॉस्पिटल मध्ये आहेत आणि त्यांच्या प्रकृती मध्ये सुधारणा होण्याची अपेक्षा नसल्याची पोस्ट करताना मुशर्रफ यांचे सर्व अवयव निकामी होत आल्याचे सांगितले गेले आहे.

शुक्रवारी पाकिस्तानी प्रसार माध्यमांनी मुशर्रफ यांचे निधन झाल्याच्या बातम्या दिल्या होत्या मात्र त्या अफवा असल्याचे नंतर जाहीर करण्यात आले. पाकिस्तानचे माजी माहिती प्रसारण मंत्री फवाद चौधरी यांनी मुशर्रफ यांच्या मुलाशी त्यांचे बोलणे झाले असल्याचे सांगून मुशर्रफ व्हेन्टीलेटरवर आहेत असे जाहीर केले होते त्यावर मुशर्रफ यांच्या परिवाराने वरील ट्वीट केले आहे.

१९९८ मध्ये तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या काळात मुशर्रफ यांना सेनेमध्ये फोर स्टार रँक दिली गेली होती त्यानंतर ते सेनाध्यक्ष झाले.१९९९ मध्ये त्यांनी तख्तापालट करून पाकिस्तानची सत्ता हाती घेतली होती. २००१ ते २००८ या काळात ते पाकिस्तानचे १० वे राष्ट्राध्यक्ष बनले जोते. माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांच्या हत्येचा आरोप त्यांच्यावर होता. २००७ मध्ये त्यांनी देशाची घटना निलंबित केल्यावर त्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप लावला गेला होता. २०१६ मध्ये ते वैद्यकीय उपचार करून घेण्यासाठी दुबईला गेले ते परत देशात आलेले नाहीत.