भारतात झपाट्याने वाढतेय गर्दुल्यांची संख्या

देशाचा अमली पदार्थ नियंत्रण विभाग म्हणजे एनसीबी कडून केल्या गेलेल्या दाव्यानुसार देशात गेल्या १५ वर्षात अमली पदार्थ सेवन करणाऱ्यांचे प्रमाण वेगाने वाढत असून हे प्रमाण २ कोटींवरून १० कोटींवर गेले आहे. यात प्रामुख्याने तरुणांची संख्या लक्षणीय आहे. एनसीबीचे उपमहासंचालक संजयकुमार सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी अश्या पदार्थाच्या व्यापारात गुंतलेल्या मोठ्या नेटवर्कचा तपास लावला आहे. डार्क नेट, प्रॉक्सी नेटवर्क व क्रीप्टोकरन्सीचा वापर करून देशात मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ तस्करी केली जात आहे. भारतात किमान १० कोटी गर्दुले हेरोइन, कोकेनचा वापर करत असून त्यात युवकांची संख्या अधिक आहे.

करोना काळात यात वाढ झाली असून २०२२ मध्ये या वाढीने अधिक वेग पकडला असल्याचे सिंग यांचे म्हणणे आहे. हेरोईन, कोकेन बरोबर अफू, गांजा या पदार्थांचे सेवन मोठ्या प्रमाणावर होत आहे. गुरुवारी या संदर्भात सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार देशात २००७ मध्ये गर्दुल्यांची संख्या २ कोटींच्या घरात होती त्यात पाचपट वाढ होऊन ती आता १० कोटींच्या घरात गेली आहे. सर्वाधिक वाढ अफू सेवनात झाली असून ही वाढ ६०० टक्के आहे. एनसीबीने २०२२ च्या पहिल्या पाच महिन्यातच २४५ खेपा पकडल्या आहेत. एप्रिल २०२१ ते आत्तापर्यंत २६ हजार कोटी किमतीचे ३८०० किलो हेरोईन जप्त करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

सिंग म्हणाले करोना काळात तस्करीसाठी नव्या पद्धती वापरात आल्या आहेत. अमली पदार्थ तस्करी साठी ड्रोनचा वापर होत आहे. कुरियर मार्फत बेनाम पार्सल पाठविली जात आहेत. डार्क नेटवरून ऑनलाईन ऑर्डर दिली जाते. याचे ट्रॅकिंग करणे अवघड जाते असेही त्यांचे म्हणणे आहे. कुरियर कंपन्यांना, पाठविणारी व्यक्ती आणि घेणारी व्यक्ती यांचे रेकॉर्ड ठेवा अशा सूचना दिल्याचे त्यांनी सांगितले.