अंबानी की बेजोस, कुणाच्या खिशात जाणार आयपीएल प्रसारण हक्क
रविवारी आयपीएल २०२३-२७ साठी मिडिया प्रसारण हक्क मिळविण्यासाठी ई लिलाव करण्याची सर्व तयारी पूर्ण झाल्याचे बीसीसीआय कडून जाहीर केले गेले आहे. मुंबईत रविवारी सकाळी ११ वा.पासून सुरु होत असलेल्या या लिलावात २ बडे बिझिनेस टायकून आमने सामने आहेत. अमेझोनचे जेफ बेजोस आणि रिलायंस उद्योगसमूहाचे मुकेश अंबानी यांच्यात हे हक्क मिळविण्यासाठी मुख्य चुरस असेल असे दिसून येत आहे. यंदा बीसीसीआय या हक्क विक्रीतून ५० ते ६० हजार कोटींची कमाई करेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
हे हक्क यापूर्वी डिस्ने स्टार कडे होते. यावेळी हि कंपनी सुद्धा लिलावात पुन्हा उतरत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे या कंपनीच्या डिजिटल प्लॅटफॉर्म हॉटस्टारच्या एकूण कमाईतील ३० टक्के हिस्सा भारतातून गोळा होतो आणि त्यात आयपीएलचा महत्वाचा वाटा आहे. या लिलावात रिलायंस, वायकॉन १८ बोधी ट्री यांनी सहयोग करार केला आहे. ते एकत्र बोली लावतील. ४० कोटी ग्राहक असलेली रिलायंस जिओ देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. अमेझोनकडे सर्वाधिक लोकप्रिय फुटबॉल लीग इंग्लिश प्रीमिअर लीगच्या लाईव्ह स्ट्रीमिंगचे अधिकार आहेत. अमेझोन सुद्धा आयपीएल हक्कासाठी पूर्ण ताकदीने उतरत आहे.
पाच वर्षापूर्वी बीसीसीआयने आयपीएल मिडिया हक्काची बेस प्राईज १६३४७ कोटी ठेवली होती ती यंदा ३२८९० कोटींवर नेण्यात आली आहे. यंदा या स्पर्धेत डिस्ने,सोनी, झी, वॉयकॉट १८, रिलायंस, अॅपल, ड्रीम ११, स्काय स्पोर्ट्स, युके सुपर स्पोर्ट्स यांनी अर्ज दिले आहेत.
अन्य खेळांचा विचार केला तर आयपीएल प्रसार हक्क कमाईत चार नंबर वर आहे. अमेरिकन नॅशनल फुटबॉल लीग, एनएफएल हक्क विक्री कमाईत १ नंबरवर आहे, दोन नंबरवर इंग्लंड प्रीमिअर लीग, तीन नंबरवर मेजर लीग बेसबॉल आहेत.