‘माझी गाडी का अडवली? माझे वडील आमदार आहेत’, BMW वरून सिग्नल तोडणाऱ्या भाजप आमदाराच्या मुलीचा पोलिसांशी वाद


बेंगळुरू – कर्नाटकातील भाजप आमदार अरविंद निंबावली यांच्या मुलीचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये ती पोलिसांशी वाद घालताना दिसत आहे. ट्रॅफिक सिग्नल तोडल्याबद्दल पोलिसांनी तिला थांबवले, त्यानंतर तरुणीने धाक दाखवत रस्त्यावर तमाशा करायला सुरुवात केली. मात्र, पोलीस कर्मचाऱ्यांनी मुलीला 10 हजारांचा दंड ठोठावून तिची हेकडी मोडून काढली.

हे प्रकरण बंगळुरूमधील राजभवनाजवळ असल्याचे सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भाजप आमदार अरविंद निंबावली यांची मुलगी बीएमडब्ल्यू कारमधून तिच्या मित्रांसोबत कुठेतरी जात होती. यादरम्यान तिने लाल दिव्याकडे दुर्लक्ष केले आणि ट्रॅफिक सिग्नल तोडून पुढे निघाली. यानंतर तेथे उपस्थित असलेल्या पोलिसांनी तिला रोखले आणि दंड देण्याबाबत सांगितले.

खूप तमाशा केला
पोलिसांनी गाडी थांबवल्यानंतर तरुणी बाहेर पडली आणि रस्त्यात तिची पोलिसांशी झटापट झाली. मुलीने स्थानिक पत्रकार आणि कॅमेरामनसोबतही गैरवर्तन केल्याचे सांगितले जात आहे. वाद घालताना मुलीने वडील आमदार असल्याचा अभिमानही दाखवला आणि पुन्हा गाडी न थांबवण्याची धमकीही दिली. यादरम्यान राजभवनाकडे जाणारा रस्ताही रोखून धरला होता.

दंड भरण्यासाठी नाहीत पैसे
मात्र, पोलिसांनी मुलीचे काही न ऐकता तिला 10 हजार रुपयांचा दंड ठोठावला. त्यानंतर ती बॅकफूटवर आली. मुलगी म्हणाली, माझ्याकडे पैसे नाहीत, म्हणून मला जाऊ द्या. पोलिसांनी ते मान्य केले नाही, त्यानंतर कारमध्ये बसलेल्या तिच्या मित्राने दंड भरला.