राष्ट्रपती निवडणूक- विशेष पेननेच करावी लागणार खूण, अन्यथा मत होणार बाद

येत्या २१ जुलै रोजी भारताला नवे राष्ट्रपती मिळणार आहेत. निवडणूक आयोगाने या साठी १८ जुलै ही मतदानाची तारीख जाहीर केली असून मतमोजणी २१ जुलै रोजी होणार आहे. या निवडणुकीत निवडून आलेले सर्व खासदार, आमदार सहभाग होतात मात्र मानद खासदार, आमदार मतदान करू शकत नाहीत. या निवडणुकीचे वैशिष्ट म्हणजे मतदान करताना मतदाराला विशिष्ट पेनचा वापर करूनच ज्याला मत द्यायचे त्यांच्या नावापुढे खूण करावी लागते. अन्य पेनाने अशी खूण केल्यास मत बाद होते.

या स्पेशल पेनचा प्रथम वापर २०१७ मध्ये केला गेला. या पेनात जांभळ्या रंगाची शाई असते. ही शाई मतदान पत्रिकेवर पसरत नाही. कर्नाटकच्या मैसूर पेंट अँड सर्व्हिस कंपनीत ही खास शाई तयार होते. ती एकदा पेपरवर लागली कि पुसता येत नाही. ही शाई तयार करण्याची प्रक्रिया गुप्त राखली जाते. नॅशनल फिजिकल लॅबॉरेटरी ऑफ इंडियाने या शाईचा रासायनिक फॉर्म्युला तयार केलेला आहे.

मतदाराचे मत देऊन झाले की हे विशेष पेन परत घेतले जाते. यावेळी ४८०९ मतदार राष्ट्रपती निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणार आहेत. सार्वत्रिक निवडणुकीप्रमाणे यात सामान्य जनता सहभागी होऊ शकत नाही. निवडून आलेल्या आमदार, खासदारांच्या मताचे मूल्य वेगवेगळे असते. स्पेशल पेनच्या वापरामुळे क्रॉस व्होटिंगची भीती असते. या निवडणूक मतदानासाठी कोणताही राजकीय पक्ष व्हीप जारी करू शकत नाही त्यामुळे आमदार, खासदार त्यांच्या पसंतीच्या उमेदवाराला मत देऊ शकतात. गतवेळी पश्चिम बंगाल, हरियाना सह अनेक राज्यात क्रॉस व्होटिंग झाले होते तर अनेक मतदारांनी चुकीच्या पेनचा वापर मत नोंदविण्यासाठी केला होता असे सांगितले जाते.