सुंदर पिचाई झाले ५० वर्षांचे
गुगल या तंत्रज्ञान क्षेत्रातील बलाढ्य कंपनीचे पहिले भारतीय वंशीय सीईओ, अमेरिकी नागरिक सुंदर पिचाई यांचा ५० वा वाढदिवस १० जून रोजी साजरा होत आहे. तमिळनाडूच्या चेन्नई येथे मध्यमवर्गीय कुटुंबात जन्म झालेले पिचाई यांनी २०१५ मध्ये गुगलच्या सीईओ पदाचा भार स्वीकारला होता आणि त्यांच्या यशाची कमान सतत चढती राहिली. आज घडीला ते गुगलची पेरेंट कंपनी अल्फाबेटचे सीईओ म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत.
पिचाई सुंदरराजन असे त्यांचे खरे नाव. १९९३ मध्ये त्यांनी खरगपूर आयआयटी मधून बीटेक पदवी मिळविली आणि त्यानंतर प्रसिद्ध स्टॅनफर्ड विद्यापीठातून एमएस आणि व्हार्टन स्कूल मधून एमबीएची पदवी मिळविली आहे. २००४ मध्ये त्यांनी गुगल मध्ये नोकरी घेतली. गुगल टूलबार आणि गुगल क्रोम विकसित करण्यात त्यांनी मोठे योगदान दिले असून काही काळात क्रोमने जगातील सर्वाधिक लोकप्रिय ब्राउझर अशी कीर्ती मिळविली आहे.
आपले जुने दिवस आठवताना पिचाई एका मुलाखतीत म्हणाले होते, स्टॅनफर्ड मध्ये प्रवेश घेण्यासाठी माझ्या वडिलांचा वर्षभराचा पगार खर्ची पडला होता. त्यावेळी प्रथमच पिचाई विमानात बसले होते. तेव्हा अमेरिका महाग होती. १ मिनिटाचा फोन करायचा तरी दोन डॉलर खर्च होत असत. अमेरिकेत येईपर्यंत संगणकावर नियमित काम करण्याची संधीच त्यांना मिळाली नव्हती. इतकेच काय पण वयाची १० वर्षे होईपर्यंत त्यांनी फोनचा वापर सुद्धा केला नव्हता.