या देशात परदेशातून पिझ्झा आयात करण्याचे फॅड
आजकाल घरपोच फूड डिलिव्हरीची सुविधा उपलब्ध झाल्याने हवे तेव्हा मनपसंत रेस्टॉरंटमधून आवडते पदार्थ घरपोच मिळण्याचा आनंद खवय्ये घेत आहेत. पण यात बहुतेक वेळा घराजवळची रेस्टॉरंट, किंवा आपापल्या गावातील अशी खादाडीची ठिकाणे निवडली जातात. नायजेरिया देशात मात्र स्वदेशी नव्हे तर परदेशातून पिझ्झा मागवून खाण्याचे फॅड फोफावले आहे. अर्थात यामागे चव, किंमत याला फार महत्व नाही तर केवळ स्टेटस सिम्बॉल म्हणून हा प्रकार केला जात असल्याचे समजते. नायजेरियाचे कृषी मंत्री औडू ओग्बेह यांनीच या संदर्भात माहिती दिली आहे.
ते म्हणाले देशातील श्रीमंत, स्टेटस सिम्बॉल म्हणून लंडन मधून पिझ्झा ऑर्डर करतात. त्यासाठी रात्रीच ऑर्डर द्यावी लागते. मग हा पिझ्झा तयार करून, व्यवस्थित पॅक करून ब्रिटीश एअरवेज च्या विमानातून सकाळीच डिलिव्हर होतो. मग संबंधित डिलिव्हरी बॉय पिझ्झा मागविल्या गेलेल्या पत्त्यावर त्याची डिलिव्हरी करतो. याचा अर्थ नायजेरिया मध्ये चक्क ६४४० किमी अंतरावरून पिझ्झा मागविला जातो. अर्थात यामुळे श्रीमंती मिरवण्याची संधी धनाढ्य लोकांना मिळत असली तरी स्थानिक व्यावसायिकांना नुकसान सोसावे लागते आहे.
या संदर्भात सरकारने पिझ्झा आयातीवर बंदी घालावी अशी मागणी स्थानिक व्यावसायिक करत आहेत मात्र सरकारने बंदी न घालता परदेशातून पिझ्झा मागवू नये असे अपील नागरिकांना केले आहे. अर्थात याचा काहीही उपयोग झालेला नाही असेही सांगितले जात आहे.