‘फोर डे वीक’ – ब्रिटन मधील ७० कंपन्या चाचणी साठी सज्ज
जागतिक स्तरावर अमेरिका, कॅनडा, ब्रिटन, आयर्लंड, ऑस्ट्रेलिया,न्यूझीलंड देशातील सुमारे सात हजार कर्मचारी, १५० कंपन्या ‘ फोर डे वर्क विक’ साठी चाचण्या करण्यास सहमत झाल्या असून त्या संदर्भात या देशांनी संमती दर्शविली आहे. यात आठवड्यात पाच दिवसांऐवजी कर्मचारी चार दिवस काम करतील आणि तीन दिवस सुटीचे असतील. कर्मचाऱ्यांचे कामाचे दिवस कमी झाले तरी पगार पूर्ण दिला जाणार असल्याचे स्पष्ट केले गेले आहे. विभिन्न क्षेत्रात काम करणारे हजारो कर्मचारी या चाचणी साठी सज्ज झाले असून ही चाचणी डिसेंबर पर्यत म्हणजे सहा महिने चालणार आहे.
ब्रिटन मधील सुमारे ७० कंपन्यांनी या मोहिमेत सहभाग घेतला आहे. ऑक्सफर्ड, केम्ब्रिज सह अमेरिकेच्या बॉस्टन विद्यापीठातील तज्ञ यात सहभागी होत आहेत. ब्रिटन मधील साधारण ३३०० कर्मचारी यात सहभागी होत आहेत. फोर डे विक साठी कर्मचाऱ्यांना काम १०० टक्के पूर्ण करण्याची अट आहे. मात्र त्या बदली त्यांचा ८० टक्केच वेळ खर्च होईल आणि पगार पूर्ण महिन्याचा मिळेल. यात उत्पादन वेग, विक्री, ग्राहक संख्या राखणे, नवे ग्राहक मिळविणे अशी सर्व पहिलीच कामे कमी वेळात करावी लागणार आहेत.
या संदर्भात सहा महिने सर्व नोंदी करून घेतल्या जातील आणि शेवटी या मोहिमेचा फायदा किती, नुकसान किती, कर्मचाऱ्यांच्या जीवनावर यामुळे काय फरक पडला याचा आढावा घेतला जाणार आहे आणि मग अंतिम धोरण ठरविले जाणार आहे असे समजते.